(FILE PHOTO)
नाशिक : इगतपुरीतील मुंढेगावच्या आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेत १५ विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यानंतर राज्य आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन शुक्रवारी या निवासी आश्रम शाळेतील सर्वच वर्ग बंद ठेवले आहेत. तसेच २४ तास दोन आरोग्य कर्माचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख यांनी दिली.
गुरुवार, दि. ९ डिसेंबर रोजी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या सर्व विद्यार्थ्यांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळा बंद केल्याने आता विद्यार्थ्यांना आपापल्या खोलीत राहण्याविना पर्याय उरलेला नाही. येथील सर्वच विद्यार्थ्यांना विलगीकरण सक्तीचे करण्यात आले असून पुढील निर्देश येईपर्यंत वर्ग बंदच राहतील, अशी शक्यता आहे.
नाशिकच्या कळवण तालुक्यात एका विद्यार्थ्याला किरकोळ लक्षणे जाणवत असल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाने सर्व विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली. या संपूर्ण शाळेत एकूण १५ विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत.
बाधित विद्यार्थ्यांना कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आश्रमशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्य यांनी भेट देऊन वैद्यकीय पथकाला सूचना केल्या आहेत.
एकूण ३४० जणांची कोरोना चाचणी
वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी यांनी आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कामगार, येणारे जाणारे नागरिक आदी ३४० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली.