‘इस्लाम खतरे में’ची बांग देणार्या अन्सारींना त्याचे पुरावे काय, असे विचारल्यावर मुद्देसूद उत्तरही देता आले नाही. अखेर उत्तरच नसलेल्या अंगावर येणार्या प्रश्नांमुळे बोबडी वळालेल्या हमीद अन्सारी यांना चक्क मुलाखत अर्धवट सोडून पळ काढावा लागला. जणू काही प्रश्नांच्या तोफगोळ्याने अन्सारींच्या अंतर्मनातला ‘कट्टर मुसलमान’ घाबरला आणि तिथून निघून गेला.
सर्वोच्चपदी पोहोचूनही कट्टर इस्लामला न सोडलेल्यांत माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. नुकतेच अन्सारी यांचे ‘बाय मेनी अ हॅपी अॅक्सिडेंट : रीकलेक्शन ऑफ अ लाईफ’नामक आत्मचरित्र प्रकाशित झाले आणि त्यांनी वर्षानुवर्षे मनात साठवलेली जळजळ पुन्हा एकदा बाहेर काढली. २००२च्या गोध्रा दंगलीवरुन विव्हळताना हमीद अन्सारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नचिन्ह लावण्याचा उद्योगही केला. तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत हुकूमशाही, राष्ट्रवाद आणि बहुसंख्याकवादाने यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असा दावा केला.
अर्थात, तथाकथित पुरोगामी बुद्धिजीवी विचारवंतांच्या वळचणीला जात अन्सारी यांनी आपल्या आत्मचरित्रातून मोदींना हुकूमशाह ठरवण्याचा प्रकार केला. मात्र, हमीद अन्सारी उपराष्ट्रपती असताना डॉ. मनमोहन सिंग कठपुतळी पंतप्रधान होते, तर सत्तेचे रिमोट कंट्रोल सोनिया गांधींकडे, पण त्यावर कधी त्यांनी आक्षेप घेतल्याचे दिसले नाही. तेव्हा अन्सारी यांनी हुकूमशाही म्हणत कधी गळा काढला नाही, कारण त्यांना उपराष्ट्रपतीपदही गांधी खानदानाच्या चाकरीपायीच मिळालेले होते. म्हणूनच मनमोहन नामधारी पंतप्रधान राहत सोनियांनी प्रतिपंतप्रधानासारखे काम करुनही इतरांच्या सोडा, पण लोकशाहीवादी हमीद अन्सारींच्या तोंडूनही शब्द फुटला नाही, तेच आज नरेंद्र मोदींना हुकूमशाह म्हणत असतील, तर ते हास्यास्पदच.
पुढचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादात नेमके वावगे काय? राष्ट्राला परमवैभवाला नेण्याचे ध्येय बाळगणे, त्यानुसार जीवनभर कार्यरत राहणे, त्या उद्दिष्ट व कार्यामागे लाखो समर्थक, अनुयायी उभे ठाकणे, हे तर कोणत्याही राष्ट्राच्या उत्कर्षासाठी अत्यावश्यकच. तथापि, आयुष्यभर परिवारवाद जोपासलेल्यांना राष्ट्रवाद कसा रुचेल? हमीद अन्सारी यांनी तेच केले व आपण अजूनही राष्ट्रनिष्ठ नव्हे तर गांधी कुटुंबाच्याच दावणीला बांधलेलो असल्याचे दाखवून दिले.
तसेच देशात ८० टक्क्यांपेक्षा अधिक हिंदू असतील, देशाची फाळणी धर्माच्या आधारे झाली असेल आणि स्वातंत्र्यानंतर ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली फक्त हिंदूंचा छळ व मुस्लिमांचे लाडच केले असतील, तर कधीतरी बहुसंख्यकांच्या भावनांचा उद्रेक होणारच. त्याला मूर्त स्वरुप ९०च्या दशकात मिळाले आणि २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकीने त्यावर शिक्कामोर्तब केले. आता यापुढेही हे तीन मुद्दे राहतीलच, हो, पण त्यावर हमीद अन्सारींना रडायचेच असेल तर त्यांनी नक्कीच हवे तितके रडून घ्यावे.
दरम्यान, हमीद अन्सारी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीच्या अमन चोपडा यांनी त्यांची मुलाखत घेतली व यावेळी देशाच्या माजी उपराष्ट्रपतींच्या मनातला इस्लामवाद उफाळून बाहेर आला. विशेष म्हणजे ‘इस्लाम खतरे में’ची बांग देणार्या अन्सारींना तसे नेमके का वाटते, त्याचे पुरावे काय, असे विचारल्यावर मुद्देसूद उत्तरही देता आले नाही. अखेर उत्तरच नसलेल्या अंगावर येणार्या प्रश्नांमुळे बोबडी वळालेल्या हमीद अन्सारी यांना चक्क मुलाखत अर्धवट सोडून पळ काढावा लागला.
जणू काही अमन चोपडा यांच्या प्रश्नांच्या तोफगोळ्याने अन्सारींच्या अंतर्मनातला ‘कट्टर मुसलमान’ घाबरला आणि तिथून निघून गेला. “तुम्ही १० वर्षे देशाचे उपराष्ट्रपती, अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरु, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, भारताचे परदेशातील राजदूत अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर होता, देशाने तुम्हाला इतके काही दिले, पण तुम्ही तुमच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी देशात मुसलमान असुरक्षित आहेत, असे म्हणालात,
याचे कारण काय?” हा सवाल अमन चोपडा यांनी केला व हमीद अन्सारी त-त-प-प करु लागले व मी ‘पब्लिक पर्सेप्शन’च्या (सार्वजनिक समज) आधारावर तसे वक्तव्य केल्याचे ते म्हणाले. म्हणजे उपराष्ट्रपतीपदी राहिलेल्या इसमाला स्वतःचे मत नाही, वास्तव काय हे जाणून घ्यायची इच्छा, तयारी नाही तर लोकांच्या सांगोवांगीवरुन स्वतःचे मत तयार करण्यालाच ते शहाणपण समजतात, हेच यातून स्पष्ट होते.
त्यापुढे मुलाखतीत झुंडहत्येचाही उल्लेख आला, पण अमन चोपडा यांनी झुंडहत्या तर हिंदूंच्याही होतात, असा प्रतिप्रश्न केला. तथापि, त्यावरही हमीद अन्सारी यांनी हिंदूंची झुंडहत्या होते अथवा नाही, याची मला काही माहिती नाही, असे उत्तर दिले. याचाच अर्थ उपराष्ट्रपतीपदी असताना आणि आताही अन्सारींना देशात नेमके काय होतेय, याचे ज्ञान नव्हते, नाही किंवा ते असूनही हिंदू तर मरण्यासाठीच असतात, छाती तर मुस्लिमांवरील कथित अत्याचारावरुन पिटायची असते, अशी त्यांची भावना असावी. अमन चोपडा यांनी हमीद अन्सारी यांना मुस्लिमांना देशात असुरक्षित वाटते, याच मुद्द्यावरुन वारंवार प्रश्न विचारले, तर ते चांगलेच बिचकले.
खरेतर उपराष्ट्रपती असताना अन्सारी यांनी बंगळुरुतील ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ युनिव्हर्सिटी’च्या २५व्या दीक्षान्त समारंभात देशातील मुस्लिमांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे असे म्हटले होते. नंतर उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्याचा पुनरुच्चार केला. त्यावरुनच अमन चोपडा प्रश्न विचारत होते. पण अखेरीस, “मी तुम्हाला आमंत्रण दिले नव्हते. तुम्ही पुस्तकाचे परीक्षण करा, तुमची मानसिकता ठीक नाही, धन्यवाद,” असे म्हणत हमीद अन्सारी तिथून उठून गेले. म्हणजेच देशाच्या उपराष्ट्रपतीपदी राहिलेला माणूस मनाला येईल तसे वाट्टेल ते बोलतो आणि त्यावर ठोस उत्तर वा स्पष्टीकरण देण्याची वेळ आली की पुरावे नसल्याने पलायन करतो, हेच यातून दिसते.
दरम्यान, एकेकाळचे काँग्रेस नेते आणि माजी उपराष्ट्रपती केवळ मुस्लिमांतील कथित असुरक्षिततेची भावना व्यक्त करुनच थांबलेले नाहीत, तर अन्सारी यांनी सातत्याने मुस्लिमांना चिथावत, त्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याची विधाने केलेली आहेत. कट्टर इस्लामवाद्यांचे कौतुक करतानाच मोदींच्या शासन काळात भारतात इस्लाम आणि मुसलमान दोघेही त्रस्त असल्याचे हमीद अन्सारी म्हणाले होते. इतकेच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यात शरिया न्यायालयांची स्थापना व्हायला हवी, असे घटनाविरोधी वक्तव्यही त्यांनी केले होते.
तसेच पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या चित्राचा अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विरोध केला तर चित्र असण्याला पाठिंबा देणार्या विद्यार्थ्यांचे अन्सारी यांनी समर्थन केले होते. अर्थात, हमीद अन्सारींनी कितीही उच्चपदे भूषवली तरी त्यांच्या मनातील कट्टर मुसलमान अजूनही जीवंत आहे हेच यावरुन दिसून येते. तसेच ‘इस्लाम खतरे में’च्या मुद्द्यावर उत्तरे देताना मात्र त्यांची दातखीळ बसते, कडव्या इस्लामप्रेमापायी केवळ बाजारगप्पांवरुनच देशाचे माजी उपराष्ट्रपतीही काहीबाही बोलत राहतात, हेच यावरुन स्पष्ट होते.