मुंबई : राज्यात वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यामुळे अनेक छोट्या पक्षांना आणि मुख्य म्हणजे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला यामुळे स्पेस मिळाली. त्यानंतर राजकारणात पुढे काय होईल कोणता पक्ष कोणासोबत जाईल यावर देखील तर्हेतर्हेच्या चर्चा आहेत. त्यातच मनसे आणि भाजप एकत्र येईल अशी एक मोठी चर्चा राजकीय विश्लेषक तसेच राजकीय नेते देखील करत आहेत. आगामी निवडणुकांना वेळ आहे , याअगोदरच आज भाजप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप सोबत मनसे जाईल याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकींना अवकाश असला, तरी पडद्यामागे राजकीय घडामोडी वेगानं घडताना दिसत आहे. शिवसेना भाजपच्या दूर गेल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजपा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याची चर्चा आहे. भाजपाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. प्रसाद लाड हे जवळपास पाऊण तास राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर होते. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.
मनसे नेते यांना याबाबत विचारले असता , राज ठाकरे जो निर्णय घेतील, तो निर्णय मनसैनिकांसाठी अंतिम असेल , लाड यांची भेट ही सदिच्छा भेट आहे अशी प्रतिक्रिया दिली.पण, कृष्णकुंजमधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. “भारतीय जनता पार्टीचा निर्धार मुंबई महापालिकेवर पक्षाचा झेंडा,” अशी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्यासोबतची भेट ही वैयक्तिक होती, असं त्यांनी सांगितलं. नमूद केलं. माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले. मात्र त्याचबरोबर “शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु,” म्हणत लाड यांनी शिवसेनेला इशाराही दिला आहे.
लाड यांनी राजकीय भेट नसल्याचं सांगितलं असलं, तरी येत्या सर्व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मनसेची जवळीक वाढत असल्याचा चर्चाना जोर धरत आहे तसेच युती झाली नाही, तर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यताही राजकीय वर्तुळात राजकीय विश्लेषक करत आहेत . त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महा विकास आघाडीला पराभूत करण्यासाठी व सत्तेत येण्यासाठी भाजप मनसे एकत्र येणार का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.