मुंबई : कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदार अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी कृषीविधेयकावर सदस्यांना बाजू मांडू दिली नाही. उलट सदस्यांचा विरोध डावलून तात्काळ आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर केलं आणि भावना व्यक्त करणाऱ्या सदस्यांना निलंबितही केलं. मी गेली ५० वर्षे संसदीय राजकारण करत असून गेल्या ५० वर्षांत मी राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं असं वर्तन पाहिलं नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यावर टीका केली. तसेच हे विधेयक तात्काळ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, कालची संपूर्ण रात्र संसद भवनाच्या आवारात आंदोलन करणाऱ्या या खासदारांची भेट घेण्यासाठी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे चहापाणी घेऊन आज सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले आहे. हरिवंश यांनी आंदोलनकर्त्या खासदारांना चहा पाजून स्वत: उपोषणास सुरुवात केली आहे. दरम्यान, उपसभापती हरिवंश याांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून आपण एका दिवसाचे उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.