संघसमर्पित ‘विलास’ विसावला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2020
Total Views |
anand lele _1  




शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर. वेळ रात्री ९ वाजताची. प्रा. आनंद लेले यांनी फोनवर विलास अण्णा पंगुडवाले गेल्याची बातमी सांगितली. धक्काच बसला, काही वेळ काहीच सुचेना. गेल्या ४० वर्षांचा संबंध असल्याने जीवनपटच डोळ्यांसमोर आला. त्यांच्या नावापूर्वी ‘कै.’ लिहिण्याची हिंमत होत नाही. पण, परमेश्वर इच्छेपुढे इलाज नाही.
 
 
कै. विलास बालपणापासून रा. स्व. संघाचा स्वयंसेवक. द्वितीय वर्षाचे (संघ शिक्षा वर्गाचे) शिक्षण झालेले. व्यायामामुळे प्रकृती व्यवस्थित, अखंड उत्साह, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, सतत धडपड, सक्रिय कार्यकर्ता, दैनिक शाखेच्या संस्कारातून तयार झालेला हुकमी कार्यकर्ता. खडकी परिसरात संघाचे काम वाढावे अशी तळमळ असणारा. दै. शाखा घेणारे कार्यकर्ते तयार व्हावेत, असा प्रयत्न करणारा. दै. शाखेचे कार्यक्रम शिस्तीत व्हावेत, असा आग्रह धरणारा कार्यकर्ता म्हणजे विलास पंगुडवाले.
 
प्रारंभीच्या काळात जुने ज्येष्ठ कार्यकर्ते कै. तात्याराव बापट, कै. श्रीपतीजी शास्त्री, अ‍ॅड. सोहनलालजी जैन, विनायकराव थोरात यांच्याशी घनिष्ठ संबंध. त्यांचा शब्द पडणार नाही याची नेहमी काळजी करणारा. त्यासाठी जीवावर उदार होऊन काम केलेला कार्यकर्ता. संघाचे काम करत असताना संघविचाराला समाज मान्यता नव्हती, प्रसंगी विरोध होत होता. कामाच्या वाढीसाठी, काम स्थिर व्हावे, यासाठी जीवावर उदार होऊन संघर्ष केला. तुरुंगवासही भोगला. पण, संघकामावरील निष्ठा किंचितही कमी झाली नाही, उलटपक्षी अधिक घट्ट झाली.
 
विलास खडकी कँटोनमेंट बोर्डात नोकरी करत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातून निवृत्त झाला. त्यानंतर खरं तर पैसे मिळवण्यासाठी काही काम करण्याची आवश्यकता होती. पण, ते न करता पूर्णवेळ सामाजिक काम करत राहिला. प्रारंभी विलास व विक्रम राठोड ही जोडी होती. विक्रमच्या दुर्दैवी मृत्यूनंतर विलास एकटा सर्वांना बरोबर घेऊन काम करत होता.
खडकी परिसरात होणार्‍या सर्व सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सदैव पुढाकार असायचा. निधी संकलन करणे, कार्यक्रम नीट होण्यासाठी काम करणे हा त्यांच्या जीवनाचा जणूकाही अविभाज्य भाग झाला होता. त्याच्या दृष्टीने कुटुंबाला दुय्यम स्थान असायचे. अखंड भारत संकल्प दिन, श्री शिवजयंती महोत्सव, दुर्गा महोत्सव यांसारखे अनेक कार्यक्रम तळमळीने करायचा. पुण्यातून चांगले वक्ते यावेत यासाठी खटपट करायचा.
 
 
त्याच्याच प्रयत्नाने खडकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला. व्यायामशाळा सुरू झाली. श्री शिवाजी सेवा समितीच्या मार्फत निधी संकलन करून हे त्याने केलेल्या कामामुळे या पुढील काळातही सर्वांना सदैव त्याचे स्मरण होत राहील.
खडकी म्हणजे ‘हॉकी’ या खेळाचे देशात स्थान असलेले उपनगर. अ‍ॅड. सोहनलालजी जैन व व्यापारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने संघ संस्थापक ‘डॉ. हेडगेवार हॉकी करंडक स्पर्धा’ सुरू केली. पू. रज्जुभय्या, कै. मोरोपंत पिंगळे व अन्य अनेक ज्येष्ठ अधिकार्‍यांच्या हस्ते बक्षीस समारंभ केला. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणे, कार्यकर्त्यांची यंत्रणा उभी करणे, उमेदवार पदयात्रा, मोठ्या सभांचे आयोजन यासाठी क्रियाशील असायचा.
 
 
विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत ‘एकात्मता रथयात्रा’, ‘गंगाजल यात्रा’, ‘रामजन्मभूमी आंदोलन’, ‘श्रीराम शिलापूजन’, ‘श्रीरामज्योत यात्रा’, ‘श्रीराम पादुकापूजन’, १९९० व १९९२ ची कारसेवा असे अनेक कार्यक्रम खडकी परिसरात मोठ्या संख्येने व्हावेत याची योजना करण्याचा प्रयत्न करायचा, हा त्याचा स्वभावच होता. विलास ‘खडकी एज्युकेशन सोसायटी’चा उपाध्यक्ष होता. संस्थेत एकदाही गैरगोष्ट घडता कामा नये, अशी त्याची इच्छा होती. आपल्यावर झालेल्या संस्काराच्या विपरीत काही घटना घडली, तर विलास त्याची दखल घ्यायचा व असे होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहायचा. संस्थेत होणारे कार्यक्रम, त्यात चांगले वक्ते यावेत, सर्व कार्यक्रम उत्तम व्हावेत असा त्याचा आग्रह असायचा.
 
 
पुण्यात ‘पतित पावन संघटना’ कै. तात्या बापट यांच्या प्रेरणेने स्थापन झाली. आपल्या स्वयंसेवक, कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये, अशी कै. तात्या बापट यांची इच्छा होती. कै. तात्या बापट यांच्यानंतर कै. श्रीपतीजी शास्त्री त्याचे पालक होते. अशी ‘पतित पावन संघटना’ खडकी परिसरात सुरू करण्यात जनाभाऊ पेडणेकर यांच्या मार्गदर्शन, सहकार्याने विलासचे योगदान महत्त्वाचे होते. विलासच्या जीवनावर कै. तात्या बापट, कै. श्रीपतीजी शास्त्री यांचा प्रभाव होता. या दोघांनी सांगितलेले कोणतेही काम विलासने प्रसंगी जीवावर उदार होऊन बिनबोभाट पद्धतीने केले आणि त्याची कधीही त्याने वाच्यताही केली नाही. कै. बापट, कै. शास्त्री, अ‍ॅड. सोहनलालजी जैन हे त्याच्या व त्यांच्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांचा विलासला फार मोठा, भक्कम आधार होता.
 
 
 
खडकीत अशी अनेक कामे विलासने झोकून देऊन समर्थपणे केली. विलास हा कामाचा आधारच होता. विलासची आर्थिक स्थिती तशी बेताची होती तरीदेखील त्याने सामाजिक कार्यात स्वतःला सहजपणे वाहून घेतल्याचे आपण सर्वांनी अनुभवले आहे. दि. ५ ऑगस्टला संकल्पित राम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्या दिवशी रात्री खडकीत विलासने कारसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम केला, तोच त्याचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. असा झोकून देऊन काम करणारा विलास आता यापुढे खडकीत गेल्यावर आपल्याला भेटणार नाही, दिसणार नाही, ही कल्पना आजही अस्वस्थ करते. पण, हे कटू सत्य स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. असा संघाचा समर्थ कार्यकर्ता असलेल्या विलासला भावपूर्ण श्रद्धांजली!
 
- विनायक डंबीर
@@AUTHORINFO_V1@@