जालना : महाविकास आघाडीतील पक्षांतर्गत नाराजी नाट्य सुरूच असून निधीवाटपावरून काँग्रेसचे ११ आमदार उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांनी केला आहे. या आमदारांनी सरकारच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे.
काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल ठाकरे सरकारवर नाराज आहे. ठाकरे सरकार निधी वाटपात दुजाभाव करत आहे. त्यावर आम्ही नाराज आहोत. सर्वांना मतदारसंघात काम करायचे आहे. त्यामुळे निधी वाटप समानपद्धतीने झाले पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. आम्ही राज्यातील काँग्रेस नेतृत्वाकडे आमची नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील ११ आमदार नाराज असून आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कैलास गोरंट्याल यांनी दिली.तसेच राज्यात निधीचे समान वाटप होणार नसल्याची तक्रार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे करण्यात येणार असून त्याबाबत सोनिया गांधींची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक महत्त्व दिले जात असल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत भेट घेतली होती.निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतलं जात नाही हा काँग्रेसने घेतलेला आक्षेप ताजा असतानाच आता निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.