मुंबई : ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अयोध्येत प्रभू श्रीराममंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामास शुभेच्छा देणारे खुले पत्र लिहिल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता असून पक्षाची वैचारिक कोंडी झाल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिपूजनाचा मुहूर्त ठरल्यापासूनच या सोहळ्याला विरोध दर्शविला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरल्यानंतर, ‘मंदिर उभारल्याने कोरोना जाईल असे काहींना वाटते’ अशी प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी भूमिपूजनाचा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र पार्थ पवार यांनी पक्षाशी दुसऱ्यांदा विसंगत भूमिका घेतल्याचे चर्चेला उधाण आले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करून पार्थ यांनी पहिल्यांदा पक्षाला अडचणीत टाकले. तर आता 'जय श्रीराम' म्हणत राममंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. काही दिवसांपूर्वीच पार्थ पवार यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करून पहिल्यांदा पक्षाला अडचणीत टाकले. तर आता राम मंदिरासंदर्भात ‘वेगळी’ भूमिका घेतली. यावर राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत पार्थची ती वैयक्तिक भूमिका आहे, असे सांगून पक्षाला पार्थपासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
पार्थ यांनी आपल्या खुल्या पत्रात पार्थ पवार यांनी या पत्राची सुरुवातच ‘जय श्री राम !’ म्हणून केली आहे. ते म्हणतात, 'अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत, असे मत व्यक्त केलं. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे', असे आवाहनही पार्थ पवार यांनी नागरिकांना केले आहे.