‘कोरोना’काळात एकोप्याचा अभाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2020   
Total Views |

global _1  H x


कोरोनासारखी जागतिक व्याप्ती असलेले आणि संपूर्ण मानवासमोर आव्हान निर्माण करणारे संकट आले असताना एकोपा दिसतो आहे का? नवे जागतिक नेतृत्व साकारते आहे का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. या साथीत ना जागतिक एकोपा दिसतो, ना नवे व्यापक नेतृत्व.



जागतिक पटलावर कोरोनाच्या साथीच्या काळात एकोप्याचे दर्शन होताना दिसत नाही. संकट समयी हे विश्वची माझे घर असा विचार दूर गेल्याचे जगातील घडामोडी दर्शवित आहे. जगातील राष्ट्रांनी आपापसातील दुही, शत्रुत्व, द्वेषमूलक राजकारण अधिक ठळक करण्यास सध्या सुरुवात केली आहे. एका पाहणीने अमेरिकेतील धृवीकरणावर प्रकाश टाकला आहे. असे म्हणतात की, संकटात लोक एकत्र येतात, एकीने त्याचा मुकाबला करतात. अशा संकटातून नवे नेतृत्व उदयाला येण्याची शक्यताही अधिक असते. कोरोनासारखी जागतिक व्याप्ती असलेले आणि संपूर्ण मानवासमोर आव्हान निर्माण करणारे संकट आले असताना एकोपा दिसतो आहे का? नवे जागतिक नेतृत्व साकारते आहे का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. या साथीत ना जागतिक एकोपा दिसतो, ना नवे व्यापक नेतृत्व.


अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाला कोरोनामुळे नवा आयाम मिळाला आहे. कोरोनाची साथ चीनपासून सुरू झाल्याने त्याच्यावर संशय होता; तो हळूहळू गडद होत गेला. अवघे जग कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्नशील असताना चीन डावपेच खेळतो आहे. दक्षिण चीन सागरी प्रदेशापासून भारतापर्यंत तो आक्रमक होतो आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताबारेषेवरील गोळीबार थांबलेला नाही. देशांतर्गत राजकारणातही दुही वाढत आहे. निवडणुकीच्या वर्षात असलेल्या अमेरिकेतल्या सत्ताधारी रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षाचे पाठीराखे कोरोनाच्या मुद्द्यावर परस्परविरोधी भूमिका घेत आहेत. थोडक्यात, कोरोना संकटातही दुही कायम आहे. अमेरिकेसमोर कोरोनाने सर्वात मोठे आव्हान उभे केले आहे. कोरोनाच्या रुग्णांची आणि मृतांची संख्या तेथे सर्वाधिक आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यशैलीमुळे आधीच दुभंगलेल्या अमेरिकेतील धृवीकरण कमालीचे वाढले आहे. कोरोनाच्या साथीला कसा प्रतिसाद द्यावा यांपासून ट्रम्प आणि त्यांचे विरोधक यांच्यात कमालीचे मतभेद असून ते वाढतच आहेत. इतके की एकाच प्रश्नाला रिपब्लिकन आणि डेमोक्रेट्स दोन टोकाची उत्तरे देत आहेत.



प्यू रिसर्च सेंटरने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या पाहणीतून, या दोघांतील धृवीकरण कोणत्या टोकाला गेले आहे, याची कल्पना येते. सलूनमध्ये जाऊन केस कापाल काय या प्रश्नावर ‘होय’ असे उत्तर देणार्‍या रिपब्लिकन पक्षाला मानणार्‍या नागरिकांचे प्रमाण ७२ टक्के, तर डेमोक्रेट्सचे प्रमाण ३७ टक्के आहे . हॉटेलमध्ये जाऊन खाण्यास पसंती देणारे रिपब्लिकन ६५ टक्के आहेत, तर डेमोक्रेट्स केवळ २८ टक्के. हे प्रश्न वैयक्तिक निवडीचे आहेत. प्रत्येक जण आपापल्या स्वभाव आणि आवडीनुसार उत्तर देत असणार; मात्र रिपब्लिकन आणि डेमोक्रेट्स यांच्या उत्तरातील टोकाचा फरक लक्षणीय आहे. धोरणात्मक बाबींमध्ये असा फरक अगदीच स्वाभाविक आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वात वाईट टप्पा संपला आहे का, या प्रश्नावर ’हो’ म्हणणारे रिपब्लिकन आहेत ६१ टक्के, तर डेमोक्रेट्सचे प्रमाण आहे २३ टक्के. कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडली असून, ती सावरण्यासाठी विविध उपाय आखले जात आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे अमेरिकेतील अर्थव्यवस्था रुळावर आली आहे का, केवळ २५ टक्के अमेरिकींनीच होकारार्थी उत्तर दिले, तर पक्षाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ४६ टक्के रिपब्लिकनांनी होकार दर्शविला. विरोधात असलेल्या ९२ टक्के डेमोक्रेट्सने नकार दर्शविला आहे . कोरोनाचा मोठा परिणाम होतोय का, या प्रश्नाचे उत्तरही असेच टोकावरचे (४४ टक्के रिपब्लिकन आणि ७३ टक्के डेमोक्रेट्स) आहे.

मास्क वापरण्यावरूनही कमालीचे मतभेद आहेत. मास्क वापरणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगत असले तरी तेथील काहींना त्याची सक्ती म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्यावरील अतिक्रमण वाटते आहे. मास्क न वापरता मॉलमध्ये गेलेल्यांना सुरक्षारक्षकांनी अडविल्यानंतर होणार्‍या बाचाबाचीचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. अशा छोट्या मुद्द्यांवरून किंवा साध्या साध्या प्रशांवरून होत असलेल्या धृवीकरणाला ट्रम्प जबाबदार असल्याचे मत तेथील जाणकार मांडतात, तर हे आपल्या विरोधातील राजकारण असल्याचा दावा ट्रम्प करतात. एकंदरीत संकटाचा सामना एकदिलाने करण्यापेक्षा त्यातून स्वतःचा स्वार्थ साधण्यात काही राष्ट्र धन्यता मानत आहेत. याची सुरुवात अमेरिकी आणि चीन यांच्या वर्तनातून झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जागतिक महासत्ता म्हणून अमेरिका व आशियातील महत्त्वाचे राष्ट्र म्हणून चीन यांनी आपल्या धोरणात वेळीच बदल करण्याची गरज आता अभिप्रेत होऊ लागली आहे.
@@AUTHORINFO_V1@@