मुंबई : ‘पीके’सारखे चित्रपट, ‘पाताललोक’सारख्या वेबसीरिज या माध्यमांतून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता, परंपरा यांची खिल्ली उडवली जाते. हिंदु समाज याविषयी आवाज उठवत नसल्याने ‘बॉलीवूड’मध्ये हिंदुद्रोहाला खतपाणी घातले जात आहे. हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्रच असल्याचे परखड मत अभिनेत्री पायल रोहतगी हिने व्यक्त केले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या ऑनलाईन परिसंवाद मालिकेत ‘हिन्दूविरोधी ‘बॉलीवूड’ का पर्दाफाश’ या विषयावरील ‘विशेष संवादा’त ती बोलत होती. पुढे ती म्हणाली,"ब्राह्मण व्यक्तीला कपटी किंवा बलात्कारी दाखवणे, भारतामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचे दाखवणे, हे सर्व म्हणजे समाजाचा ‘ब्रेनवॉश’ करणे आहे. ‘जय श्रीराम’च्या जयघोषाला अपकीर्त करणारी बॉलीवूडची मंडळी आतंकवाद्यांच्या विशिष्ट घोषणांविषयी का बोलत नाहीत ? ‘तिहेरी तलाक’विषयी का बोलले जात नाही ? असा सवाल उपस्थित करत हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्रच असल्याचे प्रतिपादन तिने केले.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले की, ज्या रझा अकादमीने मुंबईत वर्ष २०१२मध्ये दंगल घडवली होती, तिच्या मागणीवरून ‘महंमद : द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटावर बंदीसाठी महाराष्ट्र सरकारने लगेच शिफारस केली; मात्र हिंदु धर्मावर आघात करणार्या चित्रपटांना हिंदूंनी कितीही विरोध केला, तरी शासनाकडून मात्र काही कारवाई होत नाही. कायद्याचे बंधन नसल्याने ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म्सवरून अत्यंत आक्षेपार्ह, हिंदुविरोधी, देशविरोधी व सैन्यविरोधी ‘वेबसीरिज’ प्रसारित होत आहेत. ‘कोर्ट मार्शल’, ‘कोड एम्’ या वेबसीरिजमध्ये तर भारतीय सैन्य समलैंगिक असल्याचे दाखवले आहे. सरकारने अशा ‘वेबसीरिज’ व ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’ केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या नियंत्रणाखाली आणायला हवेत.
या संवादाच्या सुरुवातीला चित्रपट, मालिका, ‘वेबसीरिज’ या माध्यमांतून 'हिंदु धर्म आणि समाज' यांची कशाप्रकारे अपकीर्ती करण्यात येते हे सांगणारी चित्रफीत दाखवण्यात आली. हा ऑनलाईन संवाद यू-ट्यूब आणि फेसबूक या माध्यमांतून ३,८९,७६० लोकांपर्यंत पोहोचला, तर १,०८,४११ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला. यापूर्वी या विषयावर अनेकांनी ट्विटरवर #Censor_Web_Series हा हॅशटॅग वापरून समर्थन केले. काही वेळातच हा हॅशटॅग भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेडींगमध्ये होता. या विषयाबाबत तब्बल १ लाखाहून अधिक ट्वीट करण्यात आले.