बेस्ट वर्कर्स युनियन छेडणार प्रखर आंदोलन
मुंबई : बेस्ट उपक्रमाचे एक हजारांहून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित असून त्यामध्ये ड्रायव्हर-कंडक्टर आणि इतर स्टाफची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाबाधित कामगारांचे मृत्यूही मोठ्या प्रमाणात झाले आहेत. मात्र बेस्टकडून ते जाहीर केले जात नाहीत. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कृती समितीच्या माध्यमातून बेस्ट वर्कर्स युनियन प्रखर आंदोलन छेडणार आहे.
अत्यावश्याक सेवेसाठी धावणारी बेस्ट बस सर्वसामान्यांसाठी धावू लागल्यापासून बेस्टच्या वाहक-चालकांना कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्यावेळी बेस्ट बसेस अत्यावश्यक सेवेसाठी धावत होत्या, तेव्हा पहिल्या थांब्यावर भरून शेवटच्या थांब्याला खाली होत होत्या. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट बसेस धावत असताना त्या विनावाहक धावत होत्या. चालकाला कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून बैठकीची (सीटची) पहिली रांग प्लास्टिकने आच्छादली जात होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा चालकाशी संबंध येत नव्हता. मात्र सर्वसामान्यांसाठी बेस्ट धावू लागताच त्या प्लास्टिक सुरक्षाकवचाचे दोन भाग करण्यात आले आणि त्याचा वापर पडद्यासारखा करण्यात आला आहे. बेस्टमध्ये तिकीट घेणाऱ्या प्रवाशांचा वाहकाशी संबंध येत आहेच, परंतु पुढच्या दरवाजाने उतरण्यासाठी त्या पडद्याखालून जात असताना प्रवाशांचा चालकाशी संपर्क झाला नाही, तरी एखाद्याचा संसर्ग होत असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात सर्वसामान्यांसाठी बेस्ट खुली केल्यानंतर चालकाला प्लास्टिक सुरक्षाकवच उभारण्याची बेस्टची योजना होती, पण ती कागदावरच राहिल्याचे दिसत आहे. या एकूणच भोंगळ कारभारामुळे बेस्ट उपक्रमात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.
बेस्टमध्ये असलेल्या १००० कोरोनाबाधितांपैकी सुमारे ५०० रुग्ण बेस्ट सर्वसामान्यांसाठी झाल्यानंतर वाढले आहेत. बेस्टमधून सध्या सुमारे १० लाख लोक प्रवास करत आहेत. त्यासाठी बेस्टच्या ३२२२ बसेस रस्त्यावर धावत आहेत आणि बेस्टच्या महसुलात दरदिनी ९२ लाखांची भर पडत आहे. मात्र प्रशासन महसूल वाढला यावरच समाधानी आहे. कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत प्रशासन ढिम्म असल्याचेच दिसत आहे.
बेस्टमध्ये कोरोनाबाधितांची संख्या नजीकच्या दोन महिन्यातच वाढली आहे. बेस्टने वेळोवेळी पुरविलेल्या माहितीनुसार १५ मे पर्यंत बेस्टमध्ये १०० कामगार कोरोनाबाधित होते. तीच संख्या १८ जूनपर्यंत ५०० वर गेली आणि जून अखेरपर्यंत हीच संख्या ७०० वर पोहोचली. मात्र जुलैमध्ये त्यात ३०० कोरोनाबाधितांची भर पडल्याचे बेस्टमधीलच काही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या एक हजार कोरोनाबाधितांमधून सुमारे ७०० कामगार कोरोनामुक्त झाल्याचे सांगण्यात येत असले तरी मृत्यूंची संख्या मात्र दडपली जात आहे. बेस्टमध्ये कोरोनाबाधितांचे मृत्यू किती हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
बेस्ट प्रशासनाकडून कोरोनाबाधितांपैकी ९ मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी कामगार संघटनेच्या मते ८६ हून अधिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बेस्ट मध्ये कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध कामगार संघटना असल्या तरी त्यांची एक कृती समिती तयार करण्यात आली आहे. त्या कृती समितीत असलेल्या मान्यताप्राप्त बेस्ट वर्कर्स कामगार संघटनेने कामगारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर समितीची तातडीची मीटिंग बोलावली आहे. कामगारांच्या सुरक्षेच्या प्रश्नी बेस्ट वर्कर्स युनियनने प्रत्येक बस आगारासमोर महिनाभर मूक निदर्शने केली. मात्र तेवढ्यावरच शांत न बसता कामगारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर आता प्रखर आंदोलन छेडणार असल्याचे बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांनी सांगितले.
महिनाभर मूक निदर्शने करण्यात आली. मात्र प्रशासन ढिम्मच आहे. कामगारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर काही उपाययोजना करण्यात येत नाहीत. कोरोनाबाधितांपैकी ९३ मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र ८६ मृत कामगारांची आमच्याकडे यादी आहे. कामगाकर मोठ्या संख्येने मृत्यूमुखी पडत असतील तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक पावले उचलणे भाग आहे. त्यासाठी कृती समितीची दोन दिवसातच बैठक बोलावली आहे.
- शशांक राव, सरचिटणीस, बेस्ट वर्कर्स युनियन