स्वातंत्र्यवीर सावरकर : एक ऐतिहासिक पुनर्मूल्यांकन - अर्जुन राम मेघवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2020
Total Views |
savarkar_1  H x

 
स्वातंत्र्यवीर सावरकर : एक ऐतिहासिक पुनर्मूल्यांकन

- अर्जुनराम मेघवाल
 
आधुनिकता, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, विज्ञाननिष्ठता आणि नव्या तंत्रज्ञानासंबंधी सावरकरांचे विचार कोरोना संकटानंतर नव्या भारताचे निर्माण करताना आजही प्रासंगिक ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार देशाच्या या महान सुपुत्राच्या विचारांची प्रेरणा घेऊनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारता’च्या निर्माणासाठी मार्गक्रमण करीत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी आज त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचे स्मरण करणे, हीच भारतीय इतिहासातील या महान क्रांतिकारकास खरी आदरांजली ठरेल.
 
 
 
भारतीय संस्कृती, मूल्ये आणि व्यावहारिकता अनादि काळापासून संपूर्ण जगाला दिशा दाखवित आली आहे. भारतीय संस्कृतीद्वारे सामूहिक चेतना निर्माण झाली आणि इतिहासाच्या एका मोठ्या कालखंडामध्ये परिवर्तन घडले, हे सत्य असले तरीही त्या मार्गावरील काही व्यक्तिमत्त्वे एवढी प्रभावशाली होती की, आजही त्यांच्या विचारांनी समाजाला दिशा मिळते. अर्थात, आपल्या इतिहासकारांनी अशा काही व्यक्तिमत्त्वांना पुरेसे महत्त्व कधीही दिले नाही, हे सत्य स्वीकारण्यास मला कोणताही अडचण नाही. असेच एक व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. संपूर्ण राष्ट्र आज सावरकरांची 137वी जयंची साजरी करीत असताना या राष्ट्रनायकास आणखी व्यापकतेने समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
 
ऐतिहासिकदृष्ट्या एक गोष्ट अतिशय उल्लेखनीय आहे, ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्पावन ब्राह्मण होते, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजाच्या तथाकथित निम्न वर्गाचे प्रतिनिधित्व करीत होते. मात्र, तरीदेखील दोघांच्या विचारांमध्ये असलेल्या साम्याकडे इतिहासाने नेहमीच मौन बाळगले आहे. भारतीय समाजाच्या दृष्टीने या दोघांनी अनेकदा समान मते मांडली होती. खरेतर डॉ. आंबेडकरांच्या मौलिक विचारांनी सावरकर अतिशय प्रभावित होते. सामाजिक सुधारणा आणि दलितोत्थान याविषयी विचार मांडताना सावरकर डॉ. आंबेडकरांच्या मतांचा हवाला नेहमी देत असत. प्रत्येक भारतीयाने सप्तबंदी म्हणजे वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धिबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या झुगारून दिल्या पाहिजे, असे सावरकरांचे ठाम मत होते. स्वातंत्र्यानंतर या सुधारणांना आपल्या संविधानातही स्थान देण्यात आले. हिंदू समाजाच्या या सप्तबंदीविषयी सावरकर म्हणतात, “ज्या महार समाजाला निम्न स्थान देण्यात आले, त्याच समाजाने आम्हाला चोखामेळासारखे संत आणि डॉ. आंबेडकरांसारखा अलौकिक विचारवंत दिला. ज्यांची धर्मपरायणता आणि बौद्धिक सामर्थ्य अनेक ब्राह्मणांपेक्षा अनेकपटींनी श्रेष्ठ आहे.” व्यवसायबंदीविषयी डॉ. आंबेडकरांच्या मतांचा हवाला देत सावरकर म्हणतात, “व्यक्तीचा जन्म कोणत्याही जातीत होवो, त्याने कोणता व्यवसाय करावा हे व्यक्तीची इच्छा, क्षमता आणि आवड यावर निर्भर आहे.”
 
जातीभेदविरहित भारताची कल्पना मानणार्‍या मोजक्या लोकांपैकी सावरकर एक होते. त्यांनी आपल्या समर्थकांना सनातन धर्मातील जातीव्यवस्थेविषयी सावधही केले होते. त्यांचे असे मत होते की, ‘सनातन’ या शब्दाचा अर्थ म्हणजे अनंत काळापासून चालत आलेले विचार आणि विश्वास, ज्यांना स्वयंसिद्ध आणि अटळ मानले गेले आहे. सावरकर लिहितात, “सनातन धर्माच्या या अमूर्त धारणांच्या आड धर्माचा मनमानी पद्धतीने अर्थ लावणे आणि मानवाने तयार केलेल्या प्रथा-परंपरांचा भाग असल्याचे सांगणे म्हणजे सत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे आहे. जाती प्रथा आणि विधवा पुनर्विवाहास बंदी यास सनातन सत्य कसे मानता येईल. या प्रथा तत्काळ संपुष्टात आणणे शक्य असल्याने त्यांना सनातन धर्माचा अविभाज्य भाग मानता येणार नाही.”
 
समाजात निर्माण झालेली दरी बुजविण्यासाठी अशा सर्व बेड्यांना तोडण्याची गरज आहे. त्यांचे स्पष्ट मत होते की, आपल्याच समाजबांधवांना पशूपेक्षाही भयानक दर्जा देणे हे आपले अतिशय अमानवीय असे कृत्य आहे. ही कोणती व्यवस्था आहे, जेथे कुत्रा किंवा पाळीव पशूची पाठ थोपटणे ठीक वाटते. मात्र, आंबेडकरांसारख्या प्रकांड विद्वानासोबत हात मिळवणे म्हणजे जात गमावणे वाटते, हे तर्कसंगत कसे वाटू शकते? ज्या लोकांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था नष्ट करून अस्पृश्यांच्या रूपात पाचवा वर्ण निर्माण केला, तेच आज म्हणतात की अस्पृश्यतेस संपुष्टात आणले तर सनातन धर्म संकटात येईल. सनातन धर्माची यापेक्षा मोठी थट्टा असूच शकत नाही.
 
सावरकरांनी सामाजिक चेतनेच्या विकासासाठी बुद्धिवादास (तर्क) नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या या विचारसरणीमुळेच अनेकांनी मानवतेच्यादृष्टीने विरोधी असलेल्या विचारांचा त्याग केला. सावरकरांनी 1920 साली आपला भाऊ नारायणराव सावकरांना लिहिलेल्या पत्रात आपले विचार स्पष्टपण मांडले. ते म्हणतात, “भारतावरील परदेशी शासकांविरोधात लढणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच जातिभेद आणि अस्पृश्यतेविरोधात लढणेही आवश्यक आहे.” त्यामुळे अंदमानमधील सेल्युलर तुरुंगातून सुटका झाल्यावर रत्नागिरीस त्यांनी आपले कार्यक्षेत्र बनविले आणि समाजसुधारणा कार्यास प्रारंभ केला. रत्नागिरीमध्येच 1931 साली त्यांनी हिंदू समाजातील सर्वांना प्रवेश असलेल्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. त्याचप्रमाणे त्यांनी सहभोजन चळवळही सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून 1931 सालीच त्यांनी रत्नागिरी येथील एका मंदिराच्या उद्घाटनास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशेष आमंत्रण दिले होते. त्याचप्रमाणे 14 एप्रिल, 1942 रोजी डॉ. आंबेडकरांच्या 50व्या जन्मदिनी त्यांना लिहिलेल्या विशेष संदेशात सावरकर म्हणतात, “आपले व्यक्तिमत्त्व, विद्वत्ता, संघटनकौशल्य आणि नेतृत्वक्षमतेमुळे आज डॉ. आंबेडकर देशाचे मुख्य आधारस्तंभ बनले आहेत. अस्पृश्यता निवारणातील त्यांचे यश आणि समाजाच्या त्या घटकातही आत्मविश्वासाची भावना निर्माण करणे, ही भारतासाठी त्यांची महान सेवा आहे. त्यांचे कार्य शाश्वत आणि मानवतावादी असून प्रत्येक देशवासीयांमध्ये त्यामुळे गौरवाची भावना निर्माण होते.”
 
वीर सावरकर पहिली व्यक्ती होती, जिने 1857च्या बंडास ‘भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध’ असे संबोधले होते. त्यांनी ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथात त्यांनी तसा उल्लेख केला होता. ते पहिलेच नेते होते, ज्यांनी 1900च्या दशकातच भारतीय स्वातंत्र्याच्या लक्ष्यास निर्धारित केले होते. महाविद्यालयीन जीवनास सुरुवात झाल्यानंतर लगेच आपले वक्तृत्व आणि लेखनाद्वारे संघटन आणि क्रांतिकारी विचारांचा प्रचार-प्रसार सुरू केला होता. दुसरीकडे काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी फार उशिरा म्हणजे 1929च्या लाहोर अधिवेशनात केली होती.
1910 मध्ये फ्रान्सच्या किनार्‍याजवळ ब्रिटिश जहाजातून मारलेली उडी त्यांचे साहस आणि निष्ठेस प्रमाणित करते. विशेष म्हणजे, जवळपास एक दशकापूर्वी त्यामुळेच ब्रिटन आणि फ्रान्स या दोन साम्राज्यवादी शक्तींना ‘द हेग’ येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणे भाग पडले होते. आपल्या असाधारण कार्याने त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लंडन आणि युरोपातील विविध भागांमध्ये असलेल्या धाडसी भारतीय तरुणांना प्रोत्साहित केले होते.
 
सावरकरांच्या स्वप्नातील भारतात सर्व संस्कृतींना स्थान होते. सर्वसमावेशकतेद्वारेच भारतीय जनमानसाची जडणघडण होईल, यावर त्यांचा विश्वास होता. दुर्दैवाने, त्यांची काही विरोधात 1937 साली कर्णावती येथे झालेल्या हिंदू महासभेच्या 19व्या अधिवेशनातील त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील सोयीस्कर मुद्द्यांचा हवाला देऊन त्यांनाच द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचा जनक मानतात, जे सत्यापासून कोसो दूर आहे. त्यानंतर कोलकात्यात 1939 सालच्या 21व्या अधिवेशनात आपल्या अध्यक्षीय संबोधनात त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, हिंदू आणि मुसलमानांना आपल्या ऐतिहासिक मतभेदांना विसरून भारतीयत्वाच्या एकत्रित भावनेने संवैधानिक राष्ट्राची उभारणी करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट, 1943 रोजी नागपूर येथील प्रकाशित होणार्‍या ‘आदेश’ या मराठी साप्ताहिकाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी अधिक स्पष्ट वक्तव्य करताना म्हटले, “राष्ट्र आणि राज्य यांच्या अवधारणेविषयी कोणत्याही प्रकारच्या गोंधळाची स्थिती नको. राज्य नसले तरीही राष्ट्राचे अस्तित्व कायम राहते. जेव्हा आमच्यावर मुस्लीम शासक राज्य करीत होते, तेव्हा सरकार म्हणजेच राज्य त्यांच्या अंकीत होते. मात्र, हिंदूंचे अस्तित्व तेव्हाही अगदी अक्षुण्ण होते. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांच्या एकत्रित राज्यात कोणतीही समस्या नाही. यापूर्वीही अनेक राष्ट्रे होते, जसे की महाराष्ट्र, सौराष्ट्र, देवराष्ट्र (बिहारजवळ). आता ही राष्ट्रे कोठे आहेत, सर्व एकमेकांमध्ये मिसळून गेली आहेत. त्यामुळे जर मुस्लिमांची इच्छा असेल तर हिंदूंसोबत ते अल्पसंख्याकांच्या रूपात सहजपणे राहू शकतात. हिंदुस्तानात मुस्लिमांच्या बाबतीत हे सांगता येईल की, तुम्ही हिंदू लोक त्यांना आपल्यासोबतच ठेवण्यास तयार आहात. मात्र, मुस्लिमांनाही तेच हवे आहे का ?... अखेर कोणत्याही राष्ट्राचे महत्त्व त्याच्या आशाआकांक्षांमुळेच असते.”
 
खरे तर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला तो सर सय्यद अहमद खान यांनी आणि त्यांच्यानंतर जिनांनी त्यास आपले शस्त्र बनविले. त्यामुळे 14 मार्च, 1888 रोजी मेरठ येथील सय्यद अहमद खान यांच्या भाषणाचा उल्लेख करणे अतिशय महत्त्वाचे ठरते, कारण येथेच त्यांनी भारतासाठी विनाशकारी ठरणार्‍या द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता. ते म्हणाले, “भारतीय साम्राज्याचे प्रशासन कोणाच्या हाती असेल? मान्य करू की इंग्रज आपले सैन्य, कायदे, शस्त्रास्त्रे आणि अन्य गोष्टी घेऊन भारतातून निघून गेले, तर भारताचे शासन कोणाच्या हाती जाणार? अशा परिस्थितीत हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही सत्ता एकत्र राहतील आणि त्यांच्या शक्तीदेखील एकसारख्या असतील? तसे नक्कीच शक्य होणार नाही. आपलेच वर्चस्व रहावे, असा विचार दोघांपैकी एक तरी नक्कीच करणार. त्यामुळे दोन्ही एकत्र राहू शकतात, ही अकल्पनीय आणि असंभव अशी आकांक्षा आहे.”
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मे 1952 मध्ये पुण्यात एक महत्त्वाची घोषणा केली. ती म्हणजे 1904 साली स्थापन गुप्त क्रांतिकारी कार्ये करणारी ‘अभिनव भारत’ ही संघटना विसर्जित करण्याची. ही घोषणा करताना त्यांनी डॉ. आंबेडकरांचा ‘संवैधानिक व्यवस्थेत क्रांतिकारी संघटनांना स्थान नसते’ हा विचार अधोरेखित केला.
 
मात्र, भारतीय समाजाला नेहमीच विभाजित करण्याची इच्छा बाळगणार्‍या काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या अनमोल रत्नावर नेहमीच अश्लाघ्य आरोप केले. मात्र, ते करताना सावरकरांशी संबंधित शताब्दी कार्यक्रम आयोजनांच्या दरम्यान इंदिरा गांधी यांनी नेमके काय म्हटले होते, याचा त्यांना विसर पडतो. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सचिव पंडित बखले यांना 20 मार्च, 1980 रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की, “भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश साम्राज्याविरोधात वीर सावकरांच्या साहसी योगदानाविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे.” त्यामुळे सावरकरांवर अश्लाघ्य आरोप करताना हे ध्यानात घेणे गरजेचे आहे.
 
सावरकर यंत्राधारित अर्थव्यवस्थेचे प्रबळ समर्थक होते. भारतीय नेत्यांनी युरोपने केलेल्या चुकांपासून शिकावे, असे त्यांचे मत होते. भारतीय सिनेमाविषयी त्यांचा भविष्यकालीन दृष्टिकोन प्रशंसनीय होता. मानवाच्या नवोन्मेषशाली प्रवृत्तीवर त्यांचा विश्वास होता. ते स्वातंत्र्यसैनिक होते, समाजसुधारक होते, लेखक, कवी, इतिहासकार होते, ते राजकीय नेते होते आणि दार्शनिकही होते. मात्र, उथळ अभ्यासावर आधारित द्वेषपूर्ण इतिहास लेखनामुळे त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक विवादास्पद रंगविण्यात आली आहे.
 
आधुनिकता, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, विज्ञाननिष्ठता आणि नव्या तंत्रज्ञानासंबंधी सावरकरांचे विचार कोरोना संकटानंतर नव्या भारताचे निर्माण करताना आजही प्रासंगिक ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार देशाच्या या महान सुपुत्राच्या विचारांची प्रेरणा घेऊनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारता’च्या निर्माणासाठी मार्गक्रमण करीत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी आज त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचे स्मरण करणे, हीच भारतीय इतिहासातील या महान क्रांतिकारकास खरी आदरांजली ठरेल.
 
 
(लेखक बिकानेर, राजस्थानचे खासदार असून केंद्रीय संसदीय कामकाज आणि अवजड उद्योग राज्यमंत्री आहेत.)
(अनुवाद : पार्थ कपोले)
@@AUTHORINFO_V1@@