मुंबई महापालिका 'ई' विभागाचे १० कर्मचारी निलंबित

    14-May-2020
Total Views |

BMC_1  H x W: 0



मुंबई
: कोरोनाचा कहर वाढत असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावर गैरहजर राहिल्याने मुंबई महापालिकेच्या 'ई विभाग' कार्यालयाच्या १० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. भायखळा परिसरात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. मुंबईत कोरोनाचा कहर थांबत नसल्याने सर्व कार्यालयात कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यालयापासून दूर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जवळपासच्या कार्यालयात काम करण्याची सवलत देण्यात आली आहे. मात्र कोणतीही कल्पना न देता कार्यालयात गैरहजर राहिल्यामुळे १० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.



'जी साऊथ' (वरळी), 'जी नॉर्थ' (दादर-धारावी) प्रमाणे `ई` विभाग (भायखळा) परिसरातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ‘ई’ विभाग कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कंबर कसली आहे. मात्र मनुष्यबळ कमी पडत असल्याने मर्यादा येतात म्हणून सर्वांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही काही कर्मचारी कोणतीही सूचना न देता कार्यालयात येत नसल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी अनुपस्थित राहात आहेत. काही कर्मचारी दुरून येतात, त्यांना सवलतही दिली जाते. पण काही कर्मचारी कोणतीही सूचना न देता वा रजेसाठी अर्ज सादर न करताच वारंवार अनुपस्थित राहातात. त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली.



कारवाई करताच कर्तव्यावर हजर


मकरंद दगडखैरे यांनी सांगितले की, निलंबनाची कारवाई करताच १० पैकी ८ कामगार कामावर हजर झाले. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. अजून दोन कामगार आहेत. ते हजर झाल्यास त्यांच्यावरील कारवाई निश्चितच मागे घेण्यात येईल. मात्र ते कामावर हजर होणे आवश्यक आहे.