रोजच्या कचऱ्याचे प्रमाण साडेचार हजार मेट्रिक टन
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले महिनाभर असलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत रोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटले आहे. हॉटेल, मॉल, दुकाने बंद असल्याने कचऱ्याचे प्रमाणात घट झाली आहे. रोजच्या साडेसात हजार मेट्रिक टनावरून साडेचार हजार मेट्रिक टनावर आले असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
मुंबईत रोज साडेसात हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा जमा होतो. घरगुती कचऱ्यापेक्षा हॉटेल्स, मॅाल्स, लॉज, दुकाने आदी मोठ्या व्यावसायिकांमधून मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. याची विल्हेवाट पालिकेकडून लावली जाते. व्यापारी संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, हॉटेल इत्यादींना कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे निर्देश यापूर्वी पालिकेने दिले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी हवी तशी होत नाही. त्यामुळे जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट पालिकेला करावी लागते. कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने मोठ्या सोसायट्यांना वर्गीकरण करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार काही मोजक्या सोसायट्यांनी याची अंमलबजावणी केली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल्स, मॅाल्स, लॉज, मंगल कार्यालये, कॅटरर्स आदी व्यवसाय बंद असल्याने कचरा जमा होण्याचे रोजचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. रोज साडेसात हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक कचरा जमा होतो, आता साडेचार हजार मेट्रिक टनावर आला असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.