कोल्लम, केरळ : सध्या भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. यादरम्यान वाहतुकीचे सर्व मार्ग देखील बंद आहेत. परंतु अत्यावश्यक सेवा व आरोग्य कर्मचाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे.परंतु यापरिस्थितीत गरजूना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशाच केरळमधील एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या ६५ वर्षाच्या आजारी पित्याला खांद्यावर घेत धावताना दिसत आहे.
एकंदरीत घटना अशी की, या व्यक्तीच्या आजारी वडिलांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले.परंतु, घरी नेण्यासाठी आलेल्या रिक्षाने अत्यावश्यक सेवेसाठी असल्याचे सांगून देखील पोलिसांनी लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना दाखवत ही रिक्षा तब्बल एक किलोमीटर अंतरावरच रोखली. यामुळे आपल्या आजारी पित्याला दवाखान्यातून नेण्यासाठी भर उन्हात खांद्यावर घेत रस्त्यावर धावावे लागले.
एका वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमांचा हवाला देत रिक्षाला रोखले असून, ही व्यक्ती आपल्या आजारी वडिलांना खांद्यावर उचलून घेऊन जात आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला देखील मागच्या बाजूला पळताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती रुग्णालयाचे पत्रकदेखील दाखवते, परंतु पोलिस तरीही पोलिसांनी असहमत दर्शवत रिक्षाला परवानगी नाकारली. ही घटना केरळमधील पनालूर शहरातील आहे असे सांगितले जात आहे. आजारी वडिलांना दवाखान्यातुन नेण्यासाठी रिक्षा बोलावली होती. परंतु पोलिसांनी किलोमीटर अंतरावर ही रिक्षा रोखली. लॉकडाऊनमुळे इतर कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा मुलाने वडिलांना खांद्यावर घेतले आणि रिक्षापर्यंत पोहोचविले. या घटनेसंदर्भात केरळ राज्य मानवाधिकार आयोगाने या घटनेची नोंद घेतली असून पोलिसांना नोटीस बजावत कोणत्या परिस्थितीत रुग्णाला घेऊन जाणारे वाहन थांबविण्यात आले याची विचारणा केली आहे.