मुंबई : कोरोना विषाणू विरुध्द लढा देण्यासाठी संपूर्ण देश सरसावला आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांचा आकडा २ हजारहून अधिक आहे. अशामध्ये या लढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे निधीत सुमारे १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत. हे योगदान देणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
या निधीत ८३ वेगवेगळ्या स्तरांमधून अनेक जणांनी २५ लाखांहून अधिक रकमेचे योगदान दिल्याने निधीत १७० कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये ग्राफाईट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लूराईन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाउंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. या शिवाय चिमुकल्यांसह कित्येक व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक, व्यावसायिक आदींनीही आपापल्या परीने हातभार लावणे सुरू केले आहे. त्यामुळेच निधीत आतापर्यंत १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत.