पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठका
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानी दिल्ली मागील ३ दिवसांपासून धगधगत आहे. जाळपोळ आणि हिंसाचारात आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील ईशान्य भागातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. तसेच, नागरिकांना बाहेर पडू नये अशी विनंती सुरक्षा रक्षकांनी केली आहे. मंगळवारी गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी पंतप्रधान मोदी यांनीदेखील यासंदर्भात बैठक बोलावली आहे.
सीएएला विरोध करणारे आणि समर्थन करणारे दोन गट एकमेकांसमोर आल्याने २३ तारखेपासून दिल्लीमध्ये हिंसाचार पसरला आहे. साध्या बाचाबाचीचे रुपांतर हिंसक आंदोलनात झाले असून अनेक आंदोलकांनी घरे, दुकाने, गाड्या, सार्वजनिक मालमत्तेला आग लावण्यात आली, तसेच तोडफोडही करण्यात आली. अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटनाही घडल्या. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
आंदोलकांनी नियंत्रणात ठेवण्यासाठी सरसावलेल्या एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. तर १५०पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी काही भागात एक महिन्यापर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच 'शूट अॅ्ड साईट'चे आदेशही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला.