धर्मसत्तेची ‘अनर्थ’सत्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2020
Total Views |
pope _1  H x W:
 
 
 
 
पोप म्हणून पदभार स्वीकारल्यावर तब्बल आठ वर्षांनंतरही पोप फ्रान्सिस व्हॅटिकनमधील आर्थिक गैरव्यवहारांवर अंकुश लावण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत. परिणामी, त्यांनी व्हॅटिकनच्या आर्थिक व्यवहार आणि मालमत्तांसंबंधी अधिकारांच्या वाटपाची नवीन वर्षानिमित्त भाकरीही फिरवली. पण, त्यामुळे धर्मसत्तेतील या ‘अनर्थ’सत्तेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
 
व्हॅटिकन... जगातील सर्वाधिक कमी क्षेत्रफळाचा आणि कमी लोकसंख्येचा देश. भौगोलिक विस्तार म्हणाल तर फक्त ११० एकर आणि आपल्या मुंबईचे क्षेत्रफळच १, ४९,१०० एकर! यावरून या ‘देशाची’ कल्पना करा! पण, रोमने वेढलेल्या या छोट्याशा देशात जमीन जरी मर्यादित असली तरी जगातील सर्वाधिक मोठा धर्म ठरलेल्या अब्जावधी ख्रिश्चन धर्मीयांचे हे श्रद्धाकेंद्र. असे हे ‘मूर्ती लहान, पण (अप)कीर्ती महान’ ठरलेले व्हॅटिकन!
 
 
या व्हॅटिकनचे सर्वोच्च प्रमुख पोप असले तरी एक भली मोठी प्रशासकीय यंत्रणा या इवल्याशा देशाचा कारभार हाकत असते. पण, गेल्या कित्येक दशकांपासून व्हॅटिकनच्या नोकरशाहीला भ्रष्टाचाराने आणि आर्थिक गैरव्यवहारांनी अक्षरश: पोखरून काढले. इतके की, पोप फ्रान्सिस आणि त्यापूर्वीचे पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे भ्रष्टाचार निर्मूलनाचे आजवरचे सर्व प्रयत्न जवळपास चर्चच्याच पवित्र पाण्यात जणू विरघळून गेले. अशा या ख्रिश्चॅनिटीच्या पवित्र भूमीत आणखीन एक आर्थिक घोटाळा नुकताच उघडकीस आला आणि पुन्हा एकदा पोपसह संपूर्ण व्हॅटिकनची झोपच उडाली.
 
 
खरंतर व्हॅटिकन आणि आर्थिक घोटाळ्यांचे नाते तसे जुनेच! अगदी मागील 100 वर्षांपासून व्हॅटिकनमधील असे हजारो घोटाळे चव्हाट्यावर आले आणि आतल्या आत ते गपचूप पुरलेही गेले. बहुसंख्य आंतरराष्ट्रीय ख्रिश्चनबहुल राष्ट्रांकडून मिळणारी सहानुभूती आणि धर्मनिष्ठेपोटी या घोटाळ्यांनी सर्वोच्च धर्मसत्तेला फारसे हादरेही बसले नाहीत. परंतु, अमेरिकेतील 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय जगताने दहशतवादाच्या मुळाशी असलेल्या आर्थिक अफरातफरीकडे लक्ष केंद्रित केले आणि त्यात व्हॅटिकनचेही ‘कनेक्शन’ कालांतराने समोर आले. शेवटी आंतरराष्ट्रीय दबावाखातर का होईना, व्हॅटिकनने तोंडदेखल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवायाही केल्या. पण, अद्यापही व्हॅटिकनमधली भ्रष्टाचारावरील ‘श्रद्धा’ काही संपता संपलेली दिसत नाही.
 
 
व्हॅटिकनच्या सचिवालयातील अब्जावधी युरोंच्या घोटाळ्याने धर्माच्या नावाखाली चाललेले हे बाजारीकरण पार उघडे पडले. लंडनमधील चेसला येथील आलिशान मालमत्तेत गुंतवणुकीचे हे प्रकरण. या एकूणच व्यवहारात व्हॅटिकनचे प्रचंड नुकसान झाले आणि पुढे त्याच चौकशीतून भ्रष्टाचाराचा भलामोठा भस्मासुरही समोर आला. परिणामी, पोप फ्रान्सिस यांनी या सचिवालयाकडूनच आर्थिक व्यवहार आणि संपत्तीसंबंधी व्यवहार करण्याचे सर्वाधिकार काढून घेतले आणि ‘अ‍ॅपस्टोलिक सी’ या पोपच्या अधिपत्याखालीलच प्रशासकीय संस्थेला ते वर्ग करण्यात आले.
 
 
पोपने यासंदर्भात नवीन कायदा केला आणि भाकरी फिरवली. पोप यांच्या म्हणण्यानुसार, हे सगळे कशासाठी तर पारदर्शकता आणि कार्यक्षम व्यवस्थापनासाठी. पण, ही वरकरणीची मलमपट्टी सर्वार्थाने फसवीच म्हणावी लागेल. एका हातातून पैसे काढून, केवळ दुसर्‍या हातात ठेवण्याचा हा सर्वस्वी धुळफेक करणारा प्रकार. त्यामुळे या एका निर्णयामुळे पोप आणि एकूण व्हॅटिकनची राज्यकारभार हाकणारी ‘होली सी’ ही यंत्रणा व्हॅटिकनला भ्रष्टाचारमुक्त करू शकेल, असा विचार करणेच मुळी अतिशयोक्तीचे ठरावे.
 
 
व्हॅटिकन जगभरातील ख्रिश्चनांसाठी पवित्र धार्मिक स्थळ असले तरी ते करचुकव्यांसाठीही स्वर्गापेक्षा अजिबात कमी नाही. स्विस बँकेप्रमाणेच व्हॅटिकन बँकेतही जगभरातील श्रीमंतांनी आपली अमाप माया संचित केल्याचे आढळून आले. यामध्ये प्रामुख्याने रोम आणि युरोपीय देशांमधील धनाढ्य ख्रिश्चन आघाडीवर आहेत. एवढेच नाही, तर जगभरातील ख्रिश्चनांकडून व्हॅटिकनला प्राप्त होणार्‍या अब्जावधींच्या देणग्यांचाही खराखुरा हिशेब उपलब्ध नाहीच. उलट भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेल्या व्हॅटिकन बँकेतून अब्जावधी युरो जगभरातील इतर बँकांमध्ये सर्रास वळविले गेले. कोणी म्हणेल, व्हॅटिकनसारखा इतका चिमुकला देश, मग तो इतका गडगंज तरी कसा? याचे उत्तर अगदी सरळ आहे.
 
 
जगभरातील ख्रिश्चनांच्या देणग्या, पर्यटन, नाणी, स्टॅम्प्स, पुस्तकांच्या विक्रीतून मिळणार्‍या उत्पन्नावर व्हॅटिकनचा उदरनिर्वाह चालतो. या माध्यमांतून मिळणारी जमापुंजी मग थेट न्यूयॉर्क शेअर बाजारापासून ते जगभरातील रिअल इस्टेट बाजारात गुंतवून पैशाने पैसा वाढविला जातो. परंतु, धर्मसत्तेच्या या अनिर्बंध अर्थव्यवहारांमध्ये कोणतीही सुसूत्रता आणि पारदर्शकता नसून भ्रष्टाचारानेच ही संपूर्ण यंत्रणा पूर्णत: पोखरली आहे.
 
 
इटलीच्या कित्येक पत्रकारांनी व्हॅटिकनच्या चार भिंतींआडचे असे शेकडो घोटाळे जगासमोर आणले. त्यापैकी गर्राल्ड पोसनर या इतिहासकाराने तर थेट नाझी हिटलरही व्हॅटिकनला कशाप्रकारे ‘चर्च टॅक्स’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने अर्थसाहाय्य करीत होता, याचाही पुराव्यांनिशी पर्दाफाश केला. तसेच रोममध्ये कर्मशियल जागेत अवघे तीन स्के. मीटर जागेत चॅपल जरी उभारले तरी करसवलतीचे धोरणही व्हॅटिकनने वरकमाईसाठी अवलंबिले. पण, कालांतराने युरोपियन कोर्ट जस्टिसने हे प्रकार बेकायदेशीर ठरवत, व्हॅटिकनला जोरदार दणका दिला. एकूणच काय तर दिव्याखाली सारा अंधार असतो, अशीच ही गत!
 
पण, केवळ आपल्याकडचेच पुरोगामी नाही, तर जगभरातील सेक्युलरवाद्यांची टोळी व्हॅटिकनच्या या घोटाळ्यांबद्दल तोंडातून ‘ब्र’ही काढत नाही. पण, हिंदूंच्या मंदिरांमधील सर्व संपत्ती ही जनसेवेसाठी सार्वजनिक करा, शासनदरबारी जमा करा म्हणून बेंबीच्या देठापासून कंठशोष मात्र केला जातो. हिंदू देवस्थानांकडून देणगीचे पुरावे मागणार्‍यांची व्हॅटिकनचे दरवाजे ठोठावून आत प्रवेश करायची तरी हिंमत आहे का? की कुठल्या मशिदीत, मदरशात जाऊन त्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या तपशिलांची कागदपत्रे ही पुरोगामी-सेक्युलर मंडळी मागण्याची हिंमत कधी दाखवतील का? या सगळ्यांचे उत्तर साहजिकच ‘नाही’ असेच मिळेल. कारण, इथे अखेरीस राजसत्ता धर्मनिष्ठेपुढे खुजी ठरते. त्यामुळे व्हॅटिकनचे घोटाळे असो, अथवा केरळच्या चर्चमधील नन्सवर होणारे अत्याचार, याविषयी सगळीकडे स्मशान शांतता.
 
 
तिकडे केरळमधील एक चर्च आंतरधर्मीय विवाहाला अवैधही ठरवते. पण, ‘लव्ह जिहाद’च्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील कायद्यांवरून भाजपला, हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करणारे केरळच्या चर्चच्या निर्णयाविषयी मात्र मूग गिळून बसतात. तिकडे कुठेही कट्टरपणा त्यांच्या ध्यानीमनीही नसतो. दक्षिण अमेरिकेत कट्टर ख्रिश्चनांचा विरोध झुगारून अर्जेंटिना हा ख्रिश्चनबहुल देश गर्भपाताला कायदेशीर परवानगीही देतो. पण, त्याविषयी हेच पुरोगामी त्यांचे साधे कौतुकही करत नाहीत की, या कायद्याला विरोध करणार्‍या कट्टर ख्रिश्चनांना मानवतावादाचे धडेही देत नाहीत. त्यामुळे सेक्युलरवादाचे हे ढोंगीच देशाच्या एकतेला आणि अखंडतेला प्रत्यक्ष-अपप्रत्यक्षपणे अशी तिलांजली देत असतात.
 
 
वर्षानुवर्षे मुस्लीम, ख्रिश्चनधर्मीय हे भारतातले अल्पसंख्याक आहेत, असे बहुसंख्याकांवर बिंबवून त्यांनी केलेल्या कुठल्याही देशविरोधी, संविधानविरोधी आणि हिंदूविरोधी कृत्यांची गणनाच मुळी या पुरोगाम्यांच्या सडक्या मेंदूत होत नाही. कारण, प्रत्येकवेळेला पुरोगामित्वाचा दाखला हा हिंदूंकडूनच मागण्याची एक घाणेरडी सवय समाजातील काही घटकांना फार पूर्वीपासून जडली आहे. त्यावर उपाय तो एकच, अशा बुरख्याआड आणि झग्याआड दडलेल्या पुरोगाम्यांना जशास तसे उत्तरे देऊन त्यांना वठणीवर आणणे. त्यासाठी केवळ हिंदुत्ववादी पक्षांना मतदानावेळी राजकीय समर्थन देणे पुरेसे नाही, तर हिंदू समाजात अशा सगळ्या विषयांबद्दल जागरूकता निर्माण करणे, हिंदूंचे संघटन मजबूत करणे आणि ‘हिंदू तन-मन मेरा जीवन’ ही वृत्ती घेऊनच मार्गक्रमण करणे, हाच या इंग्रजी नववर्षानिमित्त का होईना, समस्थ हिंदूंनी संकल्प करायला हवा!




@@AUTHORINFO_V1@@