दुटप्पी भूमिकांचा पाश्चात्य खेळ

    26-Sep-2025
Total Views |

दहशतवाद हा फक्त बंदुकीच्या नळीतून होत नसतो. एखाद्या देशाला लक्ष्य करून त्याच्यावर अवाजवी व्यापारी निर्बंध लादणे, हाही एक प्रकारचा दहशतवादच! भारत अशा दोन्ही प्रकारच्या दहशतवादाशी एकाकीपणे झुंजत आहे आणि जगभरात शांतता निर्माण करण्याच्या गप्पा झोडणारे अमेरिकेसारखे देश अप्रत्यक्ष दहशतवादालाच प्रोत्साहन देत आहेत, अन्यथा ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांना मेजवानी खिलविली नसती.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ‘जी-२०’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेत, जगातील संघर्ष तातडीने मिटविण्याचे आवाहन केले आहे. या संघर्षांमुळे केवळ जागतिक शांततेलाच धोका उत्पन्न झाला आहे असे नव्हे, तर ‘ग्लोबल साऊथ’ गटातील देशांमध्ये अन्नसुरक्षा, ऊर्जा आणि खतांची टंचाई निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. हे संघर्ष तातडीने थांबविण्यासाठी दहशतवादावर कठोर उपाय योजण्याची आणि बहुधृवीय जागतिक व्यवस्था निर्माण करण्याची गरजही, त्यांनी प्रतिपादन केली. विकासाला सर्वाधिक धोका हा सशस्त्र संघर्षांचा असून हे संघर्ष थांबविल्याखेरीज शांतीपूर्ण परिस्थिती निर्माण होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. जयशंकर जेव्हा हे आवाहन करीत होते, तेव्हा ‘व्हाईट हाऊस’मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबरोबर मजेत गप्पा मारत होते. हा विरोधाभास अमेरिकेच्या दहशतवादावरील दुटप्पी भूमिकेचे उत्तम उदाहरण आहे.

एकीकडे डोनाल्ड ट्रम्प आपण सात महिन्यांत सात युद्धे थांबविल्याच्या बढाया मारीत आहेत. इतकेच नव्हे, तर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षही आपणच थांबविल्याचा तद्दन खोटा दावाही करीत आहेत. पण, त्यांना रशिया-युक्रेन युद्ध काही थांबविता आलेले नाही किंवा ‘हमास’विरोधात इस्रायल करीत असलेल्या लष्करी कारवाईलाही आळा घालता आलेला नाही. उलट जागतिक दहशतवादाची जननी असलेल्या पाकिस्तानच्या लष्करी आणि मुलकी नेतृत्वाला ‘व्हाईट हाऊस’मध्ये बोलावून ते मेजवान्या झोडत आहेत. काश्मीरमधील पहलगाममध्ये २६ निरपराध पर्यटकांचे हत्याकांड करणारा आणि आपल्याच देशातील खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील लहान मुले व महिलांवर लढाऊ विमानांतून बॉम्बफेक करणारा असीम मुनीर, हा आधुनिक फासिस्ट लष्करशहा आहे. पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची आर्थिक आणि लष्करी मदत देऊन, ट्रम्प कसली शांतता निर्माण करणार आहेत! त्याचप्रमाणे युक्रेनला कोट्यवधी डॉलर्सच्या अस्त्र-शस्त्रांची मदत करून, युक्रेन-रशिया युद्धाच्या आगीत ते तेलच ओतत आहेत. तरीही आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

भारतातील दहशतवाद हा पूर्णपणे पाकिस्तानपुरस्कृत आहे, हे अमेरिकेसह सार्या जगाने मान्य केले आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कारकिर्दीत याच ट्रम्प यांनी, पाकिस्तानला जणू वाळीत टाकले होते. त्याला मिळणारी प्रत्येक मदत थांबविली होती. परिणामी, पाकिस्तान चीनच्या अधिक जवळ गेला. ही गोष्ट अमेरिकेच्या उशिरा लक्षात आली आणि आता अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खरे तर यंदा भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविल्यापासून, ट्रम्प यांनी आपल्या भूमिकेवरून एकदम घुमजाव केले. यामागे भारताने पाकिस्तानातील काही अण्वस्त्र ठिकाणांवर केलेले इशारावजा हल्ले हेच कारण आहे. या अण्वस्त्रांच्या जोरावरच पाकिस्तान भारताला धमकावत असे, पण भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे ती अण्वस्त्रे आपण केव्हाही नष्ट करू शकतो, असा इशारा दिला आणि अमेरिकेचे धाबे दणाणले. भारताची संरक्षण सिद्धता आणि गुप्तचर यंत्रणा इतकी अद्ययावत असेल, अशी कल्पना अमेरिकेला नव्हती, असे दिसते. आपल्यालाही आव्हान देण्याच्या स्थितीत असलेल्या भारताला नमविण्यासाठीच, ट्रम्प यांनी भारताविरोधात आर्थिक आघाडी उघडली. अन्यथा युक्रेन युद्धाचा आणि भारताचा दूरान्वयानेही संबंध नाही, हे त्यांना चांगलेच ठावूक आहे. आता भारताला नियंत्रित करण्यासाठी पाकिस्तानला पुन्हा कुरवाळणे हा त्यांच्या सामरिक धोरणाचा भाग बनला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम केवळ या दोन देशांपुरता मर्यादित नाही. युक्रेन हा जगातील सर्वांत मोठा गहू आणि मयाचा निर्यातदार देश होता, पण युद्धामुळे जगाला निर्यात करणे सोडाच, युक्रेनमधील जनतेलाही पुरेशा प्रमाणात गहू उपलब्ध होऊ शकलेला नाही. तो देश अब्जावधी डॉलर्सच्या कर्जात तर बुडाला आहेच, पण त्या देशातील अनेक पायाभूत सुविधाही उद्ध्वस्त होत आहेत. युद्ध जरी थांबले, तरी युक्रेनचे पुनर्निर्माण हे आणखी मोठेच आव्हान ठरेल. युक्रेनप्रमाणेच रशियाची आर्थिक स्थिती खालावत आहे. रशियावर अवाजवी आर्थिक निर्बंध लादल्याने, त्या देशातून युरोप आणि काही आफ्रिकी देशांना होणार्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारताच्या तेलखरेदीमुळे रशिया काही प्रमाणात तग धरून आहे.

या युद्धाचा विपरित परिणाम ‘ग्लोबल साऊथ’, म्हणजेच विकसनशील देशांवर होत आहे. भारत आज विकसनशीलतेच्या गटातून वर उठत असून, अन्य देश त्याच्याकडे आपला आशादायक नेता या रूपात पाहात आहेत. कारण या आजवर अनिश्चिततेच्या काळात भारताने ‘ग्लोबल साऊथ’मधील अनेक देशांना निस्वार्थ सहकार्य केले आहे. उलट अमेरिका आता मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारा देश बनला आहे.

दहशतवाद हा केवळ बंदुकीच्या नळीतून येत नाही. एखाद्या देशावर अवाजवी आर्थिक निर्बंध लादणे, त्याच्या बाजारपेठांमध्ये आपल्या कंपन्यांना बळजबरीने प्रवेश मिळवून देणे, हाही एक प्रकारचा दहशतवादच आहे. रशियावरील निर्बंधांचे दुष्परिणाम, केवळ रशियापुरते सीमित नाहीत. रशियाकडून मिळणार्या स्वस्त कच्च्या तेलामुळे आणि नैसर्गिक वायुमुळे, युरोपात बर्यापैकी आर्थिक स्थैर्य होते. आज अनेक युरोपीय देशांमध्ये महागाई वाढत असून, आर्थिक मंदी जाणवत आहे. बेरोजगारीही वाढत आहे. हे युद्ध थांबल्याखेरीज युरोपची आर्थिक स्थिती सुधारणार नाही. एस. जयशंकर यांनी केलेले आवाहन म्हणूनच महत्त्वाचे आहे.