जिम सुरू करण्यास दसऱ्याचा मुहूर्त : अटी लागू

    18-Oct-2020
Total Views | 101
Uddhav Thackeray_1 &




सामूहिक व्यायाम प्रकार झुंम्बा, स्टिम, सौना बाथ बंदच

मुंबई : अनलॉकच्या प्रक्रीयेत अडकलेल्या राज्यभरातील व्यायामशाळा (जिम) सुरू करण्याच्या निर्णयावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. हजारो जिममालक, प्रशिक्षक आणि फिटनेसप्रेमी तरुणांचा प्रश्न अनेक आंदोलने आणि मोर्चांनंतर मार्गी लागणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितले.
 
 
जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे जिम सुरू झाली तरीही नियम आणि अटी मात्र कायम असणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
 
 
जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंदच राहणार आहेत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी तसेच महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे निखिल राजपुरीया, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य, करण तलरेजा, अभिमन्यू साबळे, महेश गायकवाड, हेमंत दुधवाडकर, साईनाथ दुर्गे, राजेश देसाई, योगिनी पाटील आदी उपस्थित होते.
 
 
 
मुख्यमंत्री म्हणाले, "जिम, व्यायामशाळा या आरोग्यासाठीच आहेत. पण त्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे मोठ्या शहरांबरोबच राज्यातील ग्रामीण भागातही जिम, व्यायामशाळा यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना तयार करण्यात आलेली ‘एसओपी’चे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. हा व्यवसाय आहे, पण तसा तो जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे, याची काळजी घेणे आवश्यक आहे."
 
 
'आता रुग्ण संख्या कमी होते आहे. पण युरोप खंडातील उदाहरणांवरून आपल्याला सावधही रहावे लागेल. आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. पण यातून हळू-हळू गाफीलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे,' असेही त्यांनी सांगितले.
 
 
अन्यथा कारवाई होणार...
 
जिम, व्यायामशाळांसाठी ‘एसओपी’ तयार केली आहे, आणि तिचे काटेकोरपालन होणे आवश्यक आहे. त्यामुळे या ‘एसओपी’चे पालन करण्याची जबाबदारी जिम, व्यायामशाळा यांच्या मालकांवर आहे. या ‘एसओपी’चे काटेकोर पालन न केल्यास, गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
 
  
दसऱ्याचा मुहूर्त
 
आरोग्य विभाग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळांचे चालक यांनी तयार केलेल्या ‘एसओपी’चे पालन करूनच दसऱ्यापासून जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा सुरू करता येणार आहेत. हे नियम तपशीलाने आणि नेमकेपणाने तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना या ‘एसओपी’ची पूर्णपणे माहिती देणे अपेक्षित आहे. व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशीलाने नियमावली तयार करण्यात आली आहे.
 
 
व्यायामशाळेत प्रवेश करण्यापासून ते व्यायाम करताना कोण-कोणती काळजी घ्यावे याचे नियम आहेत. शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे. व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे. उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे. दररोज रात्री जिम,व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.
 
 
जिममालक आर्थिक दबावाखाली
 
केंद्र सरकारने जिम सुरू करण्यासंदर्भात परवानगी दिल्यानंतरही राज्यात निर्बंध कायम ठेवण्यात आले. यामुळे गेले कित्येक महिने अनलॉक प्रक्रीया सुरू झाल्यानंतरही अनेक जिममालक आणि प्रशिक्षक व अन्य कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न उद्भवला आहे. राज्यातील जिम मालक संघटनांनी याविरोधात आवाज उठवला. थकलेले जागेचे भाडे, साहित्याची देखभाल या खर्चात येणाऱ्या ग्राहकांची मासिक आणि वार्षिक वर्गणी परत करावी लागल्याची खंत त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

'सावली'तील घरे सेवा निवासस्थानच ! महाविकास आघाडीचा चुकीचा पायंडा महायुतीकडून मोडीत,सेवानिवासस्थानांच्या बदल्यात अधिकाऱ्यांना मालकी निवासस्थान नाही

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात 'सावली' या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीडीडीचाळ परिसरातील इमारतीत सेवानिवासस्थानात वास्तव्यास असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनाही स्वस्तात घरे देण्याबाबतचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय महायुती सरकारने रद्द केला आहे. "याप्रमाणे मागण्या मान्य केल्यास पुनर्विकास प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होणार नाहीत तसेच सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवासस्थाने उपलब्ध होणार नाहीत", असे निरीक्षण राज्य सरकारने हा जीआर रद्द करतेवेळी नोंदविले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121