आमिर खानसाठी अक्षय कुमारची माघार
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अभिनेता आमिर खानशी होणारा ‘बॉक्स ऑफिस’ सामना टाळला आहे. त्याच्या या कृतीमुळे कालाविशात अक्षय कुमारची वाहवा केली जात आहे. गेली कित्येक वर्षे हे दोन्ही कलाकार चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नवीन वर्षात बॉलीवूड बॉक्स ऑफिसवर तगड्या कलाकारांचा सामना पाहायला मिळाला होता. ‘छपाक-तान्हाजी’, ‘पंगा-स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटांनंतर आमिरचा ‘लालसिंग चढ्ढा’ आणि अक्षयचा ‘बच्चन पांडे’हे दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते.
आमिर आणि खिलाडी कुमार यांच्या होणारी ही टक्कर मात्र आता टळली असल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय कुमारने त्याच्या 'बच्चन पांडे' या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही सर्वांसमोर आणली आहे.
अक्षय कुमारने घेतलेला या निर्णयामुळे खुद्द आमिरने ट्विट त्याचे आभार मानले आहेत. ''कधीकधी चर्चाच अनेक मुद्द्यांवर तोडगा असते. मी अक्षय कुमार आणि साजिद नाडियादवाला यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी माझ्या विनंतीचा मान राखत 'बच्चन पांडे'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली. मी त्यांच्या चित्रपटाच्या यशासाठी खुप साऱ्या शुभेच्छा देतो'', असे ट्विट करत आमिरने अक्षयचे आभार मानले. परस्पर समजुतीने आमिर आणि अक्षयने त्यांच्यातील या गोष्टीवर तोडगा काढला. ज्याची कलाविश्वात चर्चा केली जात आहे.
अक्षय कुमारच्या या निर्णयामुळे आता पुढच्या वर्षअखेरीस प्रेक्षकांना प्रथम ‘लालसिंग चढ्ढा’ हा चित्रपट पाहता येणार आहे. तर, २०२१च्या सुरुवातीला म्हणजेच २२ जानेवारीला खिलाडी कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांना या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे.
२०२१ मध्ये अक्षय कुमार आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बेल बॉटम’ असे या चित्रपटाचे नाव असून, हा चित्रपट २ एप्रिल २०२१ ला प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करत याची माहिती दिली.