मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने क्रिकेट जगतातील अनेक विक्रम मोडीत काढले. सध्या त्याने क्रिकेटपासून निवृत्ती घेतली असली तरी त्यांचे क्रिकेटमधील योगदान हे अविश्वसनीय आहे. पण, सचिनला क्रिकेटपटू ते क्रिकेटमधला देव या प्रवासासाठी मार्गदर्शन करणारे मोठे नाव होते, ते म्हणजे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर. गुरुवारी २ जानेवारीला रमाकांत आचरेकर यांची पहिली पुण्यतिथी. यानिमित्त सचिनने भावनिक पोस्ट करत आचरेकरांना आदरांजली वाहिली.
तुमच्या आठवणी आमच्या मनात सदैव राहतील, आचरेकर सर.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 2, 2020
You will continue to remain in our hearts, Achrekar Sir! pic.twitter.com/IFN0Z6EtAz
सचिनने आचरेकरांसोबत एक जुना फोटो पोस्ट करत "तुमच्या आठवणी आमच्या मनात सदैव राहतील, आचरेकर सर." अशी आपली भावना व्यक्त केली आहे. आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या आचरेकर सरांनी सचिनच नाही तर भारतीय क्रिकेटमधल्या एका पिढीला घडवण्यात मोठा वाटा उचलला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केले. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या आचरेकर सरांच्या आवडत्या शिष्यांनी वर्षभरापूर्वी क्रिकेट अकादमी सुरु करायच्या आधी सरांचे आशिर्वाद घेण्यासाठी भेट घेतली होती, त्यांची ती भेट अखेरची ठरली होती.