'भाग्यशाली भारतीय मुस्लीम'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |




एक इस्लाम मतानुयायी केवळ आपल्या वर्चस्वासाठी, श्रेष्ठत्वासाठी दुसर्‍या इस्लाम मतानुयायाशी झगडतो आहे किंवा परस्परांचा शत्रू झाला आहे, इतरांचे अस्तित्व त्याला नकोसे झाले आहे. मात्र, भारतात अशी परिस्थिती नाही. इथे मुस्लीम व्यक्ती इस्लाममधील कोणत्याही परंपरेचे, तत्त्वज्ञानाचे पालन करू शकते, त्याच्याविरोधात कोणी काही कारवाई करताना दिसत नाही. म्हणूनच भारतातील मुस्लिमांनी स्वतःला भाग्यशाली समजले पाहिजे. हेच मत पद्मभूषण पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मार्क टुली यांनी नुकतेच व्यक्त केले.


वर्तमान जगात सर्वाधिक अराजक, अशांतता आणि हिंसाचार कोणत्या प्रदेशात माजल्याचे दिसते? असा प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहणार्‍या कोणालाही विचारला तर त्याचे उत्तर नक्कीच आखाती आणि निवडक इस्लामी देश असेच दिले जाईल. सीरिया, लिबिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान या इस्लामी देशांतील संघर्ष, अंतर्गत बंडाळ्या आणि लाथाळ्या उघड उघड पाहायला मिळतात. इथे विश्वबंधुत्वाचा, उम्माचा नारा देणार्‍या इस्लामी अनुयायांतील वाद पराकोटीला गेल्याचेही अनुभवायला येते. वरील जवळपास सर्वच देशांत सुन्नी-शिया, वहाबी, अहमदिया, सुफी, बलूच, पश्तूनी, देवबंदी, सलाफी आदी वेगवेगळ्या गटात काही ना काही वाद सुरू आहेत. हे वाद उपासना पद्धतीवरून, अल्लाह आणि मोहम्मद पैगंबर व त्याच्या वारसाला मानण्या न मानण्यावरून, कुराण-हदीसच्या योग्य अर्थ व अनर्थावरून, भाषा-प्रांत अशा भिन्न भिन्न कारणांवरून होत असले तरी ते इस्लामला मानणार्‍यांतलेच आहेत.

 

उल्लेखनीय म्हणजे, त्यांना खतपाणी घालण्याचे काम त्या त्या देशातल्या सत्तावर्तुळातूनही होताना दिसते. सोबतच सुन्नीबहुल आणि शियाबहुल देशांतही काही ना काही कारणावरून हमरीतुमरी चालू असल्याचे दिसते. जसे की सौदी अरेबिया आणि इराण. अर्थातच, या सर्वच घटनाक्रमाचा त्रास होतो, तो त्या देशांत राहणार्‍या सर्वसामान्य मुस्लीम जनतेला. म्हणजे वाद घालणारे, संघर्ष करणारे, जीव घेणारे, हिंसाचार माजवणारे सर्व एकाच धर्माचे पण वेगवेगळ्या गटांत विभागलेले लोक आहेत. एक इस्लाम मतानुयायी केवळ आपल्या वर्चस्वासाठी, श्रेष्ठत्वासाठी दुसर्‍या इस्लाम मतानुयायाशी झगडतो आहे किंवा परस्परांचा शत्रू झाला आहे, इतरांचे अस्तित्व त्याला नकोसे झाले आहे.मात्र, भारतात अशी परिस्थिती नाही. इथे मुस्लीम व्यक्ती इस्लाममधील कोणत्याही परंपरेचे, तत्त्वज्ञानाचे पालन करू शकते, त्याच्याविरोधात कोणी काही कारवाई करताना दिसत नाही. म्हणूनच भारतातील मुस्लिमांनी स्वतःला भाग्यशाली समजले पाहिजे. हेच मत पद्मभूषण पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मार्क टुली यांनी नुकतेच व्यक्त केले. आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ मार्क टुली यांनी काही उदाहरणे आणि दाखलेही दिले, ज्यातून भारतीय मुस्लिमांची परिस्थिती अन्य इस्लामी देशांतील मुस्लिमांपेक्षा अधिक चांगली असल्याचे स्पष्ट होते. दिल्लीच्या निजामुद्दीन भागात राहणार्‍या मार्क टुली यांच्या जवळच इस्लाममधील 'तब्लीगी' जमातचे मुख्यालय आहे.

 

तब्लीगी जमात अत्यंत कठोर आणि रुढीप्रिय मानसिकतेसाठी ओळखली जाते. परंतु, त्यांच्याच शेजारी सुफी परंपरेचे केंद्र आहे, जिथे लोक निजामुद्दीन अवलियाच्या कबरीची आराधना करतात, कव्वाली गातात. हे उदाहरण मार्क टुली यांनीच दिले आहे, पण जगातल्या अपवाद वगळता इस्लामी देशात अशी परिस्थिती अजिबात नाही. तिथे अशाप्रकारे शेजारी शेजारी दोन निराळ्याच उपासना मार्ग मानणार्‍यांचे ऐक्य वास्तवात उतरूच शकत नाही. म्हणूनच मार्क टुली भारतीय मुस्लिमांना नशीबवान म्हणतात. परंतु, हे सर्व कशामुळे घडले? इथे मुस्लिमांतही लढ्याची भावना का बळावत वा तीव्र होत नाही?

 

तर भारताची किंवा हिंदूंची सहिष्णुतेची भावना देशाचे शक्तीस्थळ आहे. त्यातूनच विविध पंथ-संप्रदायांना एकाचवेळी सोबतीने राहण्याचे सद्भावी वातावरण तयार होते. टुली यांच्या मते भारत अनोखा व सर्वच धर्मांचे घर असलेला देश असून इथे आध्यात्मिकता आहे. सोबतच अन्य एका ठिकाणी हिंदू धर्माची महानता सांगताना ते म्हणाले की, “हिंदू धर्म सहिष्णू आहेच, पण इतरांचे स्वागत, आदरातिथ्य करण्याचाही त्यांना अभिमान वाटतो. हीच भारतीय इतिहासातील सर्वाधिक गौरवशाली गोष्ट आहे.” अर्थात, मार्क टुली यांचे म्हणणे ऐतिहासिक आणि वर्तमानातील सत्य व तथ्यांशी ताडून पाहिल्यास ते कुठेही चुकीचे असल्याचे आढळणार नाही. परंतु, असे असूनही भारताच्या महत्तेला आणि हिंदूंना पाण्यात पाहणार्‍यांनी हे वास्तव कधीच मान्य केले नाही. उलट हिंदूच कसे वाईट, कुरापतखोर, भयानक असल्याचे दाखविण्यासाठीच ते राबले. अशा सर्वांसाठीच मार्क टुली यांचे हे मत डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरेल, असे वाटते.

@@AUTHORINFO_V1@@