बॉलिवूडमधील नावाजलेल्या कपलपैकी एक म्हणजे नेहा धुपिया आणि अंगद बेदी. अंगद बेदी सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्याच्या चित्रपटांच्या निवडीवरून लक्षात येत आहे. आज रॉबिन या त्याच्या 'द झोया फॅक्टर' चित्रपटातील भूमिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली. या लूकमध्ये तो एकदम कुल आणि फ्रेश दिसत आहे.
'द झोया फॅक्टर' या चित्रपटात सोनम कपूर आणि दुलकर सलमान मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अंगद बेदी त्यांच्या टीमचा सुपरस्टार असल्यामुळे त्याच्याकडे प्रेक्षक लगेच आकर्षित होतील, अशी त्याची भूमिका आहे. पण त्याच्या न्यूनगंडामुळे त्याच्या स्वभावातील एक नकारात्मक बाजूदेखील या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवता येईल.
हा चित्रपट अनुजा चौहान या प्रसिद्ध लेखिकेच्या 'द झोया फॅक्टर' या नॉवेलवर आधारित आहे. यामध्ये झोया सिंह सोलंकी या राजपूत मुलीची प्रेमकथा आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित 'द झोया फॅक्टर' हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता.