नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर प्रकरणावर ६ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. राम मंदिर प्रकरणावर नेमलेल्या मध्यस्थ समितीला तोडगा काढण्यात अपयश आल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला. अयोध्याप्रकरणी निकाल लागेपर्यंत आठवड्यातले तीन दिवस सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने मध्यस्त समितीची नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र पाच महिने उलटून गेल्यानंतरही मध्यस्त समितीला यश न आल्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याप्रकरणी न्यायालयीन सुनावणी होणार असल्याचे सांगितले.
मध्यस्त समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केल्यानंतर न्या.गोगोई यांनी हा निर्णय दिला. ६ ऑगस्टपासून निकाल लागेपर्यंत नियमित सुनावणी होणार असल्याचे यांनी सांगितले. ही नियमित सुनावणी आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.