बिनकामाचे 'गुजरात फाईल्स!'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2019
Total Views |



अय्यूब यांनी या पुस्तकात नरेंद्र मोदी, अमित शाह व हिंदुत्वनिष्ठांविषयी सूडबुद्धीने लिखाण केले असले तरी प्रत्यक्षात त्यातील बहुतांश भाग खोटा आणि जाणूनबुजून मीठ-मसाला लावून लिहिलेला असल्याचे वाचताना जाणवते. आज सर्वोच्च न्यायालयानेदेखील यावरच शिक्कामोर्तब करत हे पुस्तक बिनकामाचे असल्याचे सांगितले.

 

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल फिरवत हरेन पंड्या हत्याप्रकरणात मोहम्मद असगर अलीसह ११ आरोपींना दोषी ठरवले. न्यायालयाने यातील ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षादेखील सुनावली. तत्पूर्वी उच्च न्यायालयाने २००३ सालच्या हरेन पंड्या हत्याप्रकरणातील सर्वच १२ आरोपींना मुक्त केले होते. सीबीआयने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान तर दिले, पण प्रसिद्ध विधीज्ञ प्रशांत भूषण यांच्या 'सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन' या स्वयंसेवी संस्थेने आरोपींच्या समर्थनार्थ याचिकाही दाखल केली होती. परंतु, ही बातमी नव्हे तर न्यायालयाचा त्यापुढचा निकाल अधिक महत्त्वाचा आहे. कारण, प्रशांत भूषण यांनी आपल्या याचिकेला आधार बनवले ते वादग्रस्त पत्रकार राणा अय्यूब यांनी लिहिलेल्या 'गुजरात फाईल्स - अ‍ॅनाटॉमी ऑफ ए कव्हरअप' या पुस्तकाला! परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सदर पुस्तकातील तथाकथित सत्यान्वेषणाला नाकारत, हे पुस्तक निरूपयोगी असल्याचे सांगितले.

 

हरेन पंड्या हत्याप्रकरणाशी संबंधित निकालपत्राच्या २४८ क्रमांकाच्या परिच्छेदात सर्वोच्च न्यायालयाने 'गुजरात फाईल्स' पुस्तकाविषयी टिप्पणी करत प्रशांत भूषण यांच्यासह राणा अय्यूब यांनाही तोंडावर पाडले. " 'गुजरात फाईल्स' हे पुस्तक केवळ कल्पना, अनुमान आणि तर्कावर लिहिलेले असून पुरावा म्हणून ते ग्राह्य धरता येणार नाही. लेखिकेने पुस्तकात मांडलेले अंदाज, त्यांचे वैयक्तिक विचार आणि मते असून एखाद्या व्यक्तीचे विचार वा मत पुराव्यांच्या परिघात येत नाही," असे न्यायालयाने स्पष्ट केले. सोबतच न्यायालयाने आरोपींच्या बाजूने दाखल केलेली याचिका फेटाळत ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. हा झाला न्यायालयीन निकाल. परंतु, २०१६ साली 'गुजरात फाईल्स' पुस्तक प्रकाशित झाल्यापासून ते आजतागायत त्याच्या जोरावर उड्या मारणार्‍या आणि नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप, रा. स्व. संघ तसेच हिंदुत्वनिष्ठ व तमाम हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍या शहाण्यांचे काय?

 

राणा अय्यूब या 'तहलका' नियतकालिकात पत्रकार म्हणून काम करत असताना गुजरात दंगलीचे वास्तव शोधपत्रकारितेच्या माध्यमातून समोर आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. हरेन पंड्या हत्याप्रकरणही त्यातलाच एक भाग. पुढे गुजरात दंगलीशी संबंधित पोलीस अधिकारी आणि काही राजकारण्यांची भेट घेत त्यांनी सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राणा अय्यूब यांनी २०१० सालापर्यंत परिश्रम करून शोधलेले तथाकथित सत्य छापायला 'तहलका'सहित इतर माध्यमांनी वा प्रकाशन संस्थेने अजिबात उत्सुकता दाखवली नाही. माध्यमांच्या या नकारावरूनच पुस्तकातून फारसे काही निष्पन्न होणार नाही, हे त्यांच्याही लक्षात आल्याचे दिसते. त्यानंतर राणा अय्यूब यांनी स्वत:च आपण शोधलेले 'सत्य' २०१६ साली मोदींच्या सत्तारोहणानंतर पुस्तकरूपात छापत हिंदुत्वनिष्ठ आणि भाजप व संघाविरोधात आगपाखडीचा एककलमी कार्यक्रम सुरू केला.

 

हिंदुत्वनिष्ठ म्हणजे कोणी भयंकर श्वापदे असून ते घोर मानवताविरोधी आहेत, ते समाजावरील मोठे संकट आहेत, या आविर्भावात वावरणार्‍या अय्यूब यांनी त्यांच्याजवळ गुजरात दंगल प्रकरणाशी संबंधित अधिकारी आणि राजकारण्यांविषयी ठोस पुरावे असल्याचा दावा या पुस्तकातून केला आहे. हे पुरावे गोळा करण्यासाठी त्या गुजरातमध्ये आठ महिने 'मैथिली त्यागी' असे खोटे नाव धारण करून राहिल्या आणि अनेक प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेतेमंडळींच्या भेटी घेऊन त्यांच्या मुलाखती त्यांनी चोरून ध्वनिमुद्रित केल्या. परंतु, आपण काहीतरी मोठे गूढ उकलत आहोत, असा आव आणून अय्यूब यांनी या पुस्तकात नरेंद्र मोदी, अमित शाह व हिंदुत्वनिष्ठांविषयी सूडबुद्धीने लिखाण केले असले तरी प्रत्यक्षात त्यातील बहुतांश भाग खोटा आणि जाणूनबुजून मीठ-मसाला लावून लिहिलेला असल्याचे वाचताना जाणवते. आज सर्वोच्च न्यायालयानेदेखील यावरच शिक्कामोर्तब करत हे पुस्तक बिनकामाचे असल्याचे सांगितले.

 

पैसे मिळवण्यासाठी खोटे नाव धारण करून आणि चोरून ध्वनिमुद्रण करून चार ओळी इंग्रजीत लिहिता येतात म्हणून काहीतरी खरडणे, ही 'स्टिंग ऑपरेशन'ची व्याख्या अशा उथळ आणि प्रसिद्धीलोलुप पत्रकारांमुळेच झाल्याचे या घटनेवरून समजते. सोबतच गुजरात दंगलीमध्ये दलित अधिकार्‍यांचा वापर वादग्रस्त कामांसाठी करण्यात आला, हा या पुस्तकात अय्यूब यांनी लावलेला जावईशोध आणि आरोप हाही अर्थातच केवळ हिंदूद्वेषातून आल्याचे समजते. यातून अय्यूब यांचा 'हिंदू कसे आपल्याच धर्मातील बांधवांशी हलकटपणे वागतात', हे दर्शविण्याचा कावाही लक्षात येतो. दुसर्‍या बाजूला भलेही गुजरात दंगलीप्रकरणी अधिकार्‍यांची निष्क्रियता, त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग आदी गोष्टी क्षणभर सत्य मानल्या (ज्या तशा नाहीत) तरी सुज्ञ माणसाला 'गुजरात दंगल' हा विषय केवळ एवढ्यापुरता घेऊन भागत नाही.

 

ही दंगल कशाची प्रतिक्रिया म्हणून झाली, प्रत्यक्षात देशात हिंदू आणि मुस्लिमांची स्थिती कशी आहे, याचा साकल्याने विचार करावा लागतो, तेव्हा त्याचा खरा अन्वयार्थ उलगडत जातो. सत्याचा शोध घेणारे राणा अय्यूब यांसारखे पत्रकार मात्र याविषयी कान, डोळे आणि तोंडावर सोयीस्करपणे हात ठेवतात. म्हणूनच हेच 'स्टिंग ऑपरेशन' राणा अय्यूब यांनी गोध्रा प्रकरणी का केले नाही? हिंदूंना जाळण्यामागे कोणाचा हात आहे, ते शोधण्यासाठी का केले नाही? आगीमध्ये गेलेला निष्पाप हिंदूंचा बळी त्यांच्या लेखी काहीच नाही का? की हिंदूंच्या मुळावर उठलेल्या मुस्लिमांचे 'स्टिंग ऑपरेशन' करण्याचे धैर्य त्यांच्यात नाही? हे प्रश्न उपस्थित होतात.

 

राणा अय्यूब यांनी आपल्या पुस्तकात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात अपप्रचार तर केलाच, पण अनेक चौकशी समित्या, आयोग, न्यायालयीन निर्णय यांनादेखील खोटे ठरवले. गुजरात दंगल असो वा हरेन पंड्या यांची हत्या यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीच मुस्लिमांच्या कत्तलीत मध्यवर्ती भूमिका निभावली, असे राणा अय्यूब आपल्या पुस्तकातून मांडतात. त्याचवेळी हिंदू समाज मुस्लिमांशी कशाप्रकारे वाईट वागला आणि मुस्लीम कसे निरागस आहेत, हे सांगण्याचा हास्यास्पद प्रकारही राणा अय्यूब यांनी यातून केला. परंतु, या पुस्तकातून लेखिकेने केवळ दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या मुस्लिमांचाच विचार केला; गोध्रा जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या आणि दंगलीदरम्यान हत्या केल्या गेलेल्या हिंदूंंविषयी सहानुभूती तर नव्हेच, साधा शोधपत्रकारितेचा एखादा उताराही दिला नाही आणि ना ही त्याच्या तपासासाठी कोणा अधिकार्‍याला प्रश्न विचारण्याचे सौजन्य दाखवले. म्हणजेच मुस्लीम हेच माणूस असल्याचे आणि हिंदू हे दखल घेण्याइतकेही माणूस नसल्याची राणा अय्यूब यांची विखारी प्रवृत्तीही दिसते. दुसर्‍या बाजूला 'गुजरात फाईल्स'चे दाखले देत देशातल्या सर्वच पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी, बुद्धीजीवी वगैरे म्हणवल्या जाणार्‍यांनी मोठा गहजब माजवला होता. मुंबईतील २६/११च्या हल्ल्यावर एस. एम. मुश्रीफ या माजी पोलीस अधिकार्‍याने 'हू किल्ड करकरे?' नावाने पुस्तक लिहून आणि त्यांच्याच गोटातल्यांनी या पुस्तकाला वारेमाप प्रसिद्ध देत धादांत खोट्याचा खेळ मांडल्याचे आठवत असेलच.

 

तसाच प्रकार 'गुजरात फाईल्स'बाबतही झाला. हरेन पंड्या हत्याप्रकरणातील मोहम्मद असगर अली हा निर्दोष असल्याचे आणि त्यात नरेंद्र मोदींचाच हात असल्याचे सिद्ध करण्यासाठी आता प्रशांत भूषण यांनी याच 'गुजरात फाईल्स'चा आधार घेतला. पण, तथाकथित शहाण्यांनी आपली बुद्धी गहाण टाकलेली असली तरी सर्वोच्च न्यायालयाला कोणत्या गोष्टीला कितपत महत्त्व द्यायचे आणि कोणाला उडवून लावायचे, हे चांगलेच समजते. म्हणूनच न्यायालयाने कोणतीही तथ्यात्मक माहिती न देणार्‍या आणि काल्पनिक विश्वात स्वैर संचार करत मनाला वाट्टेल ते लिहिणार्‍यांना आपल्या निकालातून चांगलीच चपराक लगावली. आता तरी 'गुजरात फाईल्स'ला डोक्यावर घेऊन नाचणार्‍यांचे पाय जमिनीला टेकावेत; अन्यथा असाच कपाळमोक्षाचा पुनर्प्रत्यय पुढेही येतच राहील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@