ठाणे : देशाच्या इकोसिस्टमला धक्का न लावता विकास करणे गजरेचे असून भारतासमोर असलेली पर्यावरणीय आव्हाने आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून समजून घेणे आवश्यक असल्याचे मत, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित ‘ग्रीन आयडिया’ या पर्यावरण महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मांडले. तसेच हा महोत्सव पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनामध्ये नक्कीच परिवर्तन आणू शकतो, असे म्हणत त्यांनी ‘मुंबई तरुण भारत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरण दिनाचे अवचित्य साधून ‘मुंबई तरुण भारत’ने ठाण्यात तीन दिवसीय पर्यावरण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या बुधवारी पार पडलेल्या उद्धाटन सोहळ्याला परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी महोत्सवाच्या उद्घाटनासोबत वन्यजीव संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संशोधकांना ‘ग्रीन अॅव्हेजर्स’ पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक केले.
‘ग्रीन आयडिया’ या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाची प्रस्तावना सृश्रृत चितळे यांनी केली. तर ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांनी या महोत्सवामागील भूमिका स्षष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन हे विषय नेहमीच माध्यमांकडून दुर्लक्षित राहतात . मात्र, यापुढे दरवर्षी ‘ग्रीन आयडिया’ महोत्सवाचे आयोजन करुन ‘मुंबई तरुण भारत’ पर्यावरण रक्षण आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्राला हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम करेल. तसेच पर्यावरणचा ऱ्हास न करता विकास साधणे हे सद्यस्थितीत आपल्यासमोरील मोठे आव्हान असून प्लास्टिक पासून इंधन निर्मिती, वृक्षारोपन असे उपाय एकत्रित राबविल्यास देशाचा विकास नक्की होईल असा विश्वास प्रवीण परदेशींनी आपल्या भाषणात व्यक्त केला. यावेळी ठाणे महानगरपालिका उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या विविध पर्यावरणीय कामांचा आढावा मांडला.
तारपा आणि पथनाट्य
महोत्सवाचे उद्घाटन झाल्यावर पर्यावरण पर्यटन या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. तर उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांनी ‘तारपा’ या लोकनृत्याच्या तालावर ठेका धरला. यावेळी उपस्थित प्रेक्षक तारपाच्या तालावर मंत्रमुग्ध झाल्याचे दिसले.
विविध संस्थांचे प्रदर्षण
‘ग्रीन आयडिया’ या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्यावरणवादी संस्था दाखल झाल्या आहेत. पर्यावरणाच्या विविध विषयांमध्ये काम करणाऱ्या ५० हून अधिक संस्था पुढील दोन दिवस या महोत्सवात ठिय्या मांडून असणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र वन विभाग, कांदळवन संरक्षण विभाग, बीएनएचएस, मत्स्यव्यवसाय विभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यनाचा समावेश आहे. या सर्व संस्थांचे प्रदर्शन ६ आणि ७ जून रोजी पर्यावरणीय प्रेमींकरिता सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
महोत्सवात आज
आज महोत्सवात सकाळपासून विविध संस्थांचे प्रदर्षण खुले असणार आहे. सायंकाळी ६ वाजता वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत ग्रीन आयडिया या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायकांळी ७ वाजता पक्षी निरीक्षणावर बीएनएचएसच्या शास्त्रज्ञ तुहिना कट्टी, ८ वाजता सागरी जीवांविषयी प्रदीप पाताडे आणि ९ वाजता कचरा व्यवस्थानासंबंधी शैलेंद्र सिंग राजपुत यांच्याशी परिसंवाद पार पडेल.