आजारी ‘वरुणे’ला स्वच्छतेची आस...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2019   
Total Views |

goda_1  H x W:


अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य भवताली असले की
, मनुष्यप्राणी कासावीस होत असतो. सभोवतालच्या दूषित वातावरणामुळे नागरिक आजारी पडण्याचीदेखील अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र, संपूर्ण मानवी जीवनाला आसरा प्रदान करणारी आणि मनुष्य जीवनाची जीवनवाहिनी असणारी नदीच आजारी असेल तर? या प्रश्नाचे उत्तर नागरिक आणि प्रशासन यांच्याकडे सापडणे खचितच शक्य आहे.


गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी असलेली वरुणा नदी ही गेल्या अनेक वर्षांपासून आजारी आहे आणि तिच्या आजाराचे कारण हे तिच्या पात्रात नागरिकांनी केलेली घाण, तिचा वळविण्यात आलेला प्रवाह, तिच्या पात्रात करण्यात आलेले काँक्रिटीकरण आदी आहेत. आपल्या प्रवाहाने मानवी जीवनाची तृष्णा भागविणारी नदी ही तिच्याच याचकाच्या उपद्रवामुळे आजारी होणे, हे समृद्ध गोदाकाठास नक्कीच आत्मपरीक्षण करावयास भाग पाडणारे आहे.


वरुणा
(वाघाडी) ही नाशिकजवळ म्हसरूळ परिसरातील चांभार लेणी या परिसरात उगम पावते व सुमारे सहा ते साडेसहा किमीचा प्रवास करून ती पेशवेकुंड येथे गोदावरी नदीला येऊन मिळते. येथेच अरुणा, वरुणा आणि गोदावरी संगम आपणास पाहावयास मिळत असे. मात्र, सध्या हा संगम येथे होताना दिसत नाही. तसेच पूर्वी याच पेशवेकुंडात वाघाडी, सरस्वती, गायत्री, सावित्री, आणि श्रद्धा या नद्यांचा संगम होत असे.


मात्र
, वरुणा नदी उगमस्थानावरून जरी दृष्टीपथात असली तरी, नवीन मंजूर २०१७च्या शहर विकास आराखड्यानुसार (डीपी नुसार) वरुणा नदीला वळण देण्यात आले आहे. त्यामुळे वरुणा नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलला गेला आहे. यामुळे चामर लेणी परिसरातून उगम पावणारी ही नदी सध्या भाजीबाजारच्या खालून गणेशवाडी एस. पी. एस. च्या दिशेने वळविण्यात आली असल्याने तिचा पेशवेकुंड येथे गोदावरीशी होणार्‍या संगमास अवरोध निर्माण झाला आहे. पूर्वी नाशिकची मूळ ओळख असलेली अरुणा, वरुणा आणि गोदावरी हा नद्यांपैकी अरुणा आणि वरुणा आज ओळखतादेखील येत नसल्याचे कटू सत्य समोर येत आहे. आता वरुणा नदीचे नाव हे वाघाडी झाले आहे आणि याचबरोबर या नदीचे आता नाल्यात रूपांतर झाले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या १८ नाल्यांच्या यादीचे अवलोकन केले असता, वरुणा नदीचा उल्लेख हा ‘वाघाडी’ नाला असा करण्यात आला असल्याची माहिती नदी या विषयाचे अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमी देवांग जानी यांनी दिली. त्यातच उगम परिसरातील म्हसरूळ ते गणेशवाडीपर्यंतच्या पट्ट्यात मोठी गटारे या वरुणा नदीत सोडण्यात आली आहेत. त्यामुळे वाघाडी नाल्याचे रूपांतर आता गटारात झाले आहे.


वरुणा नदीचे स्थानिक लोकांनी
‘वाघाडी’ असे नामकरण केले, त्यामागे भूमिका अशी होती की, वरुणा नदी पावसाळ्याच्या काळात वाघासारखी धावत असते. त्यामुळे तिला ‘वाघाडी’ ही बिरुदावली लावण्यात आली आहे. गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी असणारी वरुणा नदीचे आता नाला आणि नाल्याचे गटारात रूपांतर झाल्याने नाशिककरांना अनेकविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. २०१६ आणि २०१९ मध्ये नाशिकला आलेल्या महापुराचा जर अभ्यास केला तर असे दिसून येते की, वरुणा नदीला पावसाच्या पाण्यामुळे प्रचंड वेग असतो. ती तिची सीमा ओलांडून गोदावरीत मिसळण्याचा प्रयत्न करते. मात्र गोदावरी व वरुणा (वाघाडी) या दोन्ही नद्यांना वेग असल्याने वरुणा नदी गोदावरीच्या पाण्याला टक्कर देत पुन्हा मागे फिरते. (रिव्हर्स येते) नदीच्या संरचनेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास असे दृश्य हे फार क्वचितच दिसून येते. नदीच्या या प्रवाही संरचनेमुळे पंचवटी परिसरातील नागचौक, काळाराम मंदिर परिसरात पुराच्या पाण्याचे साम्राज्य पसरते. परिणामी, येथील जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच नागरिकांची वित्तहानीदेखील मोठ्या प्रमाणात होते.


वरुणा नदीच्या काही भागांत जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेअंतर्गत झालेल्या लक्ष्मी पार्कच्या कामांतर्गत नदीपात्रात काँक्रिटीकरण झाले
, त्यामुळे नदीपात्र उथळ झाले असल्याने ही समस्या भेडसावत असल्याचे जानी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. वरुणा नदी ही नदी किंवा नाला नसून खुले गटार झाले आहे. या नदीत कचराकुंडीलादेखील लाजवेल, असा कचरा दिसून येतो. त्यामुळे मुख्यत: पावसाळी असणार्‍या या नदीतील हा कचरा पावसाळ्यात पाण्याबरोबर प्रवाही होऊन पाण्याच्या प्रवाहास अवरोध निर्माण होतो. त्यामुळे पुराचे पाणीदेखील वाढते. तसेच नाशिक शहराची भूजल पातळी सुस्थितीत ठेवायची असेल तर गोदावरीच्या उपनद्या पुनरूज्जीवित करणे हे अत्यावश्यक आहे. स्मार्ट सिटीमध्ये ‘वाघाडी रिव्हर फ्रंट’ योजना आणण्यात आली होती. मात्र, त्यास शहरातील नदीप्रेमींनी विरोध केला. कारण, या नदीप्रेमींच्या मते वरुणा (वाघाडी) नदी ही आजारी आहे. तिच्याबाबत कोणत्याही परियोजना आखण्यापूर्वी तिला बरे करणे आवश्यक आहे. त्यानंतर या नदीबाबत धोरणे आखण्यात यावी, अशी मागणी जानी यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी करत आहेत.


वरुणा
(वाघाडी) नदीला तिचे मूळ रूप प्रदान करून देण्यासाठी आणि तिला लवकरात लवकर मानवी उपद्रवाच्या आजारातून बरे करणे कामी गोदावरी काँक्रिटीकरण मुक्त झाल्यावर आणि गायब झालेली अरुणा नदी दृष्टीपथात आणल्या नंतर वरुणा (वाघाडी) नदी हा विषय हाती घेण्यात येणार असल्याचे जानी यांनी सांगितले आहे. वरुणा नदी ही आध्यात्मिकदृष्ट्या ‘सूर्यपुत्री’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ही नदी पुनरूज्जीवित होणे अत्यावश्यक आहे. या नदीकाठचा परिसर हा नदी पुनरूज्जीवित झाल्यास भूजल पातळीच्या वाढीने नक्कीच समृद्ध होण्यास मदत होईल. जोपर्यंत शहरातील नद्यांना त्यांचे मूळ स्वरूप प्राप्त होत नाही, त्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत नाहीत, त्यांचा नैसर्गिक मार्ग त्या अनुसरत नाहीत, तोपर्यंत नदीपात्रात आणि पात्रालगत होणारी कोणतेही काम शाश्वत असेल काय, याबाबत नक्कीच शंका आहे.नागरी वस्तीत घाणीचे साम्राज्य पसरले असता तातडीने आवाज उठविणार्‍या नागरिकांपैकी काही नागरिक मात्र नदीपात्राला गृहीत धरतात की काय, असा प्रश्न वरुणा (वाघाडी) या नदीचे पात्र पाहून येतो. नदी ही सर्वांचीच असल्याने आणि ती खर्‍या अर्थाने जीवनदायिनी असल्याने तिचे सौंदर्य अबाधित राखणे, ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. तसेच, नदीच इतकी स्वच्छ ठेवावी की, त्यात कचरा टाकण्याची इच्छाच होऊ नये, असे कार्य करणे ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे, असेच यानिमित्ताने म्हणावेसे वाटते.



@@AUTHORINFO_V1@@