'मेट्रो -३'चे ७० टक्के भुयारीकरण पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2019
Total Views |

 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील महत्वकांक्षी मेट्रो प्रकल्पांपैकी एक असलेल्या 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या 'मेट्रो-३' प्रकल्पाच्या भुयारीकरणाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्यामध्ये 'मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळा'ला (एमएमआरसी) यश मिळाले आहे. भुयारीकरणाचे हे संपूर्ण काम डिसेंबर, २०२० पर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास 'एमएमआरसी'ने मुंबईकरांना दिला आहे.

 

भारतातील पहिल्या संपूर्णपणे भुयारी असणाऱ्या 'मेट्रो-३' या मार्गिकेचे निर्माणकार्य मुंबईत वेगाने सुरू आहे. दिवसागणिक या मार्गिकेमध्ये निर्मितीकार्याचे नवनवीन पायंडे पडत आहेत. गेल्या आठवड्यात या मार्गिकेचे २३ वे भुयार खणून पूर्ण झाल्याने ३३.२५ किलोमीटर भुयार खणण्याची कामगिरी फत्ते झाली आहे. या प्रकल्पामध्ये अप-डाऊन अशा दोन्ही मार्गिका मिळून एकूण ५५ किमीचे भुयारीकरण करावयाचे आहे. त्यामधील आता ३३.२५ किमीचे म्हणजेच एकूण भुयारीकरणाच्या ७० टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. 'मेट्रो-३' प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या कामाला नोव्हेंबर, २०१७ मध्ये माहिमच्या नयानगर येथील विवरात 'टनल बोअरिंग मशीन' (टीबीएम) उतरवून सुरुवात करण्यात आली. संप्टेबर, २०१८ मध्ये या प्रकल्पातील पहिले भुयार खणून पूर्ण झाले. त्यानंतर गेले वर्षभर भुयारांचे काम पूर्ण होण्याची मालिका सुरुच होती. गेल्या आठवड्यात नयानगर ते धारावीदरम्यान 'मेट्रो-३'चे २३ वे भुयार खणून पूर्ण झाले.

 

 
 

या प्रकल्पात आता ९ भुयारे खणून पूर्ण होणे शिल्लक आहे. हे काम पुढील १२ महिन्यांमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती 'एमएमआरसी'चे संचालक (प्रकल्प) एस.के.गुप्ता यांनी दिली. प्रकल्प निर्माणाचे काम जलद गतीने पूर्ण होण्याबरोबरच त्यामध्ये सुरळीतता आणण्याकरिता निर्माणकार्याची विभागाणी सात पॅकेजमध्ये करण्यात आली आहे. त्यामध्ये 'मरोळ नाका ते आरे' या पॅकेज सातमधील भुयारीकरणाचे काम सर्वाधिक पूर्ण झाले आहे. याठिकाणी ९७ टक्के म्हणजेच ७ किमीचे भुयार खणून झाले असून १२ डिसेंबर, २०१९ पर्यत या पॅकेजमधील भुयारीकरणाची कामगिरी फत्ते होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. आजतागायत पूर्ण झालेल्या ३८ किमीच्या भुयारामध्ये २७,०३० सिमेंट रिंग लावण्यात आल्या आहेत. तर हा संपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी १६ हजार कुशल आणि अकुशल कामगार दिवस-रात्र मेहनत करत आहेत.

 

'मेट्रो-३' प्रकल्प पूर्ततेच्या दिशेन एक-एक टप्पे पूर्ण करत आहेत. हा मेट्रो मार्ग प्रतिदिवस १७ लाख प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे. प्रकल्पाचे ७० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले असून 'एमएमआरसी' महाराष्ट्र सरकार, कंत्राटदार आणि मुंबईकरांचे आभारी आहे.

 

- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका, एमएमआरसी

 
 

भुयारीकरणाच्या कामाची सदस्थिती ( पूर्ण झालेले - टक्यांमध्ये)

 

पॅकेज १ (कफ परेड ते हुतात्मा चौक) - ५६ टक्के

पॅकेज २ (सीएसएमटी ते ग्रांट रोड) - ८६ टक्के

पॅकेज ३ ( मुंबई सेंट्रल ते वरळी) - ३८ टक्के

पॅकेज ४ ( सिद्धिविनायक ते शितलादेवी मंदिर) - ७४ टक्के

पॅकेज ५ (धारावी ते सांताक्रुझ) - ७४ टक्के

पॅकेज ६ (आंतरदेशीय विमानतळ ते आंतरराष्ट्रीय विमानतळ) - ६० टक्के

पॅकेज ७ (मरोळ नाका ते आरे) - ९७ टक्के

@@AUTHORINFO_V1@@