अजय-अतुल यांच्या संगीत दिग्दर्शनाचा आणखी एक उत्कृष्ठ नमुना असलेले 'पानिपत' या चित्रपटातील 'मन मे शिवा' हे नवीन कोरे गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. अर्जुन कपूर, क्रिती सॅनॉन, संजय दत्त ,गश्मीर महाजनी, पद्मिनी कोल्हापुरे,मोहनीश बहल, कुणाल कपूर,सुहासिनी मुळ्ये यांच्यासह अनेक सुप्रसिद्ध कलाकार या गाण्यामध्ये झळकले आहेत.
अतिशय सुंदर सिनेमॅटोग्राफी असलेल्या या गाण्याला कुणाल गांजावाला, दीपांशी नगर आणि पद्मनाभ गायकवाड यांच्या आवाजाने बहार आणली आहे. शिवाय आकर्षक वेशभूषा, भव्य सेट्स आणि उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी जुळून आल्या असल्याचे गाणे पाहिल्यावर लक्षात येते.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' या चित्रपटातील अजय-अतुल या सुप्रसिद्ध संगीतकारांच्या जोडगोळीने संगीतबद्ध केलेल्या 'मन मे शिवा' या गाण्याचे शब्द जावेद अख्तर यांनी तर मराठी शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत.
दरम्यान या पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरमधील सदाशिवराव भाऊ यांची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन कपूरच्या ट्रेलरमधील अभिनयाविषयी बऱ्याच नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. त्यामुळे त्यानिमित्ताने का होईना चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी औत्सुक्याचे वातावरण निर्माण झाले.