ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : दैनिक नवाकाळचे ज्येष्ठ संपादक, लेखक, पत्रकार नीळकंठ यशवंत खाडिलकर यांचे शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या तेज लेखणीने गेली ६ दशके सातत्याने अन्यायाविरोधात अग्रलेखांच्या माध्यमातून वाचा फोडणारे खाडिलकर काळाच्या पडद्या आड गेले.

 

अग्रलेख, समाजवाद आणि आपल्या भारधार वक्तृत्वाने त्यांनी नवाकाळची कीर्ती साता समुद्रापार पोहोचवली होती. तसेच सामान्य जनतेचा तोफखाना अशी त्यांची ओळख होती. दुपारी ३ वाजता चंदनवाडी स्मशानभूमी, मरीन लाईन्स स्थानकासमोर त्यांचा अंत्यसंस्कार विधी केला जाणार आहे. तसेच नवाकाळ कार्यालय खाडिलकर रोड गिरगाव येथे दुपारी १२ ते २ दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

 

जाणून घ्या नीळकंठ खाडिलकर यांची कारकीर्द

 

नीळकंठ खाडिलकर यांचा जन्म ६ एप्रिल १९३४ रोजी झाला. नीळकंठ खाडिलकर 'दैनिक नवाकाळ' या वृत्तपत्राचे अनेक वर्षे संपादक होते. या काळात महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी अग्रलेखांमधून भाष्य केले. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखातकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या. तसेच, वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू आणि विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले.

 

दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे संपादक म्हणून खाडिलकर यांनी जवळपास २७ वर्षे काम केले. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू. ते ‘दैनिक संध्याकाळ’ या नावाचे सायंदैनिकही काढत असत. निळूभाऊ खाडिलकरांचं ‘हिंदुत्व’ हे पुस्तक समीक्षकांच्या आणि वाचकांच्या पसंतीस उतरले. नीळकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांचे प्रबोधन केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचनही वाचकांपर्यंत पोहचविले.

 


खाडिलकर यांनी ’नवाकाळ’ जनसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ केले

अग्रलेखांचे बादशाहहा खिताब सार्थ करणारे नीलकंठ खाडिलकर लढवय्ये पत्रकार होते. थोर परंपरा लाभलेले ‘नवाकाळ’ वृत्तपत्र चालविताना त्यांनी ते श्रमिक, कष्टकरी व जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ बनविले. कामगारांच्या व सर्वसामन्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली तसेच अनेक प्रश्नांचा शासनदरबारी पाठपुरावा केला. देशाशी तसेच राज्याशी निगडीत विविध विषयांवर वाचकांचे प्रबोधन करतांना त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रप्रेम व संस्कृतीप्रेमाची भावना जागविली. नीलकंठ खाडिलकर यांचे महान कार्य पत्रकार व समाजसेवकांना नेहमी प्रेरणा देत राहील. त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो व त्यांच्या सर्व आप्त स्वकीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो.

- भगत सिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र

पत्रकारितेतील आदर्श व्यक्तिमत्व हरपले

ज्येष्ठ संपादक निळकंठ खाडिलकर यांनी पत्रकार, मुलाखतकार, संपादक अशा विविध भूमिकांमध्ये आपल्या अभ्यासू व तर्कशुद्ध लेखनाने इतिहासासोबतच वर्तमानाचे विवेकी विवेचन केले. यांच्या निधनामुळे पत्रकारितेतील एक आदर्श व्यक्तिमत्त्व हरपले आहे. खाडिलकर कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.

- विनोद तावडे, माजी शिक्षणमंत्री

वैचारिक मंथनातून समाजमन घडविण्याची क्षमता

ज्येष्ठ पत्रकार, संपादक नीळकंठ खाडिलकर यांनी आपल्या लेखणीतून अनेक प्रश्नांना वाचा फोडली. वैचारिक मंथनातून समाजमन घडविण्याची क्षमता त्यांच्या लेखणीत होती. आज ते आपल्यात नाहीत. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.

- देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री

एका उत्तम संपादकाला आपण मुकलो

सामान्य माणसावर होणार्या अन्यायाला अग्रलेखाच्या माध्यमातून वाचा फोडणारे ज्येष्ठ पत्रकार निळकंठ खाडिलकर यांच्या निधनाने आपण एका उत्तम संपादकाला मुकलो आहोत. मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निळकंठ खाडिलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि खाडिलकर कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी बळ मिळो ही ईश्र्वर चरणी प्रार्थना करतो.

-चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

निर्भीड व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांवरील अन्यायाविरूद्ध लढणारे एक आक्रमक आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. सर्वसामान्यांच्या व्यथांप्रति ते अतिशय संवेदनशील होते. एक पत्रकार म्हणून व्े केवळ बातम्या लिहून थांबले नाहीत, तर लोकांचे प्रश्न तडीस लावणे ही जणू आपलीच जबाबदारी आहे, या भावनेतून त्यांनी काम केले. ‘अग्रलेखांचे बादशहा’ या उपाधीने ओळखले जाणे, ही त्यांच्या परखड पत्रकारितेला मिळालेली लोकमान्यता होती. ते पत्रकारितेतील एक चालता-बोलता ज्ञानकोष होते.

- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

निर्भीड व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांवरील अन्यायाविरूद्ध लढणारे एक आक्रमक आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. सर्वसामान्यांच्या व्यथांप्रति ते अतिशय संवेदनशील होते. एक पत्रकार म्हणून व्े केवळ बातम्या लिहून थांबले नाहीत, तर लोकांचे प्रश्न तडीस लावणे ही जणू आपलीच जबाबदारी आहे, या भावनेतून त्यांनी काम केले. ‘अग्रलेखांचे बादशहा’ या उपाधीने ओळखले जाणे, ही त्यांच्या परखड पत्रकारितेला मिळालेली लोकमान्यता होती. ते पत्रकारितेतील एक चालता-बोलता ज्ञानकोष होते.

- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

@@AUTHORINFO_V1@@