पुणे : राज्यात २८८ जागांसाठीच्या एकूण ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले. मतदानाचा टक्का तितकासा वाढला नसला तरीही काही व्यक्तींनी आपल्या कृतीतून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पर्वती येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या ९७ व्या वर्षी पुरंदरे यांनी मतदान केंद्रावर जात आपले कर्तव्य पार पाडले. मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले होते. मतदान करणे ही एक वेगळी अनुभूती असते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.