अखेरच्या दिवशी भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य-कांस्य
जकार्ता : मागील १४ दिवसांपासून सुरु असलेल्या आशियाई खेळांचा मेळा म्हणजे आशियाड स्पर्धांचा थरार आज संपला. भारताने आज अखेरच्या दिवशी दोन सुवर्ण पदके पटकावत भारतीय चाहत्यांना गोड आठवणी दिल्या. बॉक्सर अमित पांघलने ४९ किलो वजनी गटात, तर प्रणब बर्धन-शिबनाथ सरकार या जोडीने ब्रिज या पत्त्यांच्या क्रीडा प्रकारा पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.
याशिवाय भारताने दिवसभरात स्क्वॉशमध्ये एका रौप्यपदकाची कमाई करून एकूण पदकसंख्या ६९ वर नेली. तर भारताच्या पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानला धूळ चारत कांस्यपदक मिळवले आणि भारताला पदकांची सत्तरी गाठून दिली. विशेष म्हणजे आशियाड स्पर्धांच्या इतिहासातली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यंदाच्या आशियाडमध्ये भारताने सर्वाधिक ७० पदके मिळवली आहेत. भारताने याआधी गुआंगझू येथे झालेल्या २०१० सालच्या आशियाड स्पर्धेत ६५ पदके पटकावली होती.