केरळच्या चर्चमधील आणखी एक धक्कादायक प्रकार उघड
कोट्टायम : चर्चच्या आवारात पाच पाद्रींनी एका महिलेवरील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. केरळमध्ये एका ४४ वर्षीय ननने आपल्यावर चर्चमधील बिशपने १३ वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. केरळ पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी सायरो-मलबार कॅथोलिक चर्चचे बिशप फ्रान्सो मुलक्कल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ननने आपल्या तक्रारीत म्हटले की, "जालंधर प्रांताचे बिशप मुलक्कल यांनी माझ्यावर १३ वेळा बलात्कार केला. बिशपने केलेल्या अत्याचाराविरोधात मी चर्चकडे तक्रारही केली, पण चर्चने माझ्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही."
केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात काम करत असलेल्या ननचे म्हणणे आहे की, "सन २०१४ पासून बिशपने माझ्यावर बलात्कार केला." ननने सांगितले की, "सन २०१४ मध्ये बिशपने काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्च करण्यासाठी मला नोटीस पाठवली होती. त्यानंतर मी बिशपला भेटण्यासाठी गेले आणि तिथेच बिशपने माझ्यावर बलात्कार केला." ननने केलेल्या तक्रारीनुसार या घटनेनंतर बिशपने जवळपास १४ वेळा तिच्यावर बलात्कार केला. कोट्टायमचे पोलिस अधीक्षक हरि शंकर यांनी याबाबत सांगितले की, "कुराविलांगद पोलिस ठाण्यामध्ये बिशप मुलक्कल यांच्याविरोधात भादंवि. कलम ३७६ अनुसार गुन्हा दाखल केला आहे.”
पोलिसांनी सांगितले की, "बिशपनेदेखील ननविरोधात तक्रार दाखल केली आहे. बिशपने आरोप केला की, ननने मला ब्लॅकमेल केले होते आणि लैंगिक शोषण प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती." पोलिसांनी सांगितले की, "बिशप मुलक्कल यांनी आमच्याकडे २३ जून रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत बिशपने म्हटले होते की, ननने माझ्यापुढे लैंगिक शोषणाचा मुद्दा उपस्थित केला, ज्यानंतर मी ननला प्रशासकीय पदावरुन हटवले. त्यामुळेच तिने माझ्याविरोधात तक्रार दाखल केली. बिशपच्या तक्रारीच्या आधारावर आम्ही भादंवि. कलम २९५-अ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नन आणि बिशप दोघांच्याही तक्रारीवर गुन्हे दाखल केले आहेत आणि प्रकरणाचा तपासही सुरु केला आहे."