मुंबई : घाटकोपर पश्चिमेत जागृती पार्क परिसरात जीवदया लेनमध्ये परिसरात तांत्रिक बिघाड झाल्याने चार्टर्ड विमान कोसळले आहे. या विमानात पायलटसह चार जण होते. या चार जणांसोबत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-९० हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचे खासगी विमान असल्याचे सांगितले जात होते. मात्र, विमान आपल्या मालकीचा नसल्याचा उत्तर प्रदेश सरकारने दावा केला असून संबंधित विमान हे उत्तर प्रदेश सरकारने यू आय अॅव्हिएशन या कंपनीला विकले असल्याचे सांगितले आहे.
दुर्घटनाग्रस्त चार्टर्ड विमाच्या पायलट महिला वैमानिक होत्या. तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिला वैमानिकेने प्रसंगावधान दाखवत विमान मोकळया जागेत नेल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या दुर्घटनेने परीसरात मोठ्याप्रमाणात आगीच्या लाटा दिसत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून परिसर रिकामा करण्यास सुरुवात झाली असून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवल जात आहे.