
स्टार्ट अप बद्दल तरुणांमध्ये क्रेज
जळगाव, १० जून
तरुणांमध्ये स्टार्ट अप बद्दल प्रचंड क्रेज दिसून येते. स्टार्टअप मध्ये येणारे पहिले अपयश हा नवीन शोधाचा उगम असतो. त्यातूनच भविष्यातील मोठ्या यशस्वी स्टार्टअप ची सुरुवात होते. यासाठी तरुणांनी केवळ ऐकीव माहितीच्या आधारे किंवा केवळ इतरांचे अनुकरण न करता योग्य मार्गदर्शक व सहकारी किंवा तज्ञांची जुळवाजुळव करून आपल्या स्टार्टअप ची सुरुवात करावी असा सल्ला तज्ञांनी आज जळगाव जिल्ह्यातील तरुणांना दिला.
तरुण उद्योजकांना स्टार्ट अप विषयात योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि स्टार्टअप संदर्भातील विविध उपक्रमांचा महाराष्ट्रातील उद्योजकांना लाभ मिळण्यासाठी स्किलसीखो डॉट कॉमने, मिशन एमपीएससी डॉट कॉम व ग्राहक दृष्टी ह्यांच्या सहकार्याने आयोजित स्टार्टअप महाराष्ट्र यात्रा डीपीडिसी सभागृहात पार पडली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी, द इंडिया नेटवर्कचे संस्थापक राहुल नार्वेकर, इन मराठी डॉट कॉमचे संस्थापक ओंकार दाभाडकर, पेेंटलिबचे मनिष पांडे, स्किलसिखोचे कुणाल गडहिरे, दीपस्तंभ फाउंडेशन चे यजुर्वेन्द्र महाजन, मिशन एमपीएससी चे सहसंस्थापक ]ग्राहकदृष्टीचे संचालक उपस्थित होते.
पहिल्या सत्रात नारवेकर यांनी तरुणांनी पूर्वतयारी न करता कोणताही व्यवसाय सुरू केल्यास अपयश येण्याची शक्यता अधिक असते यातून नैराश्य येते व परिणामी ज्या तरूणामध्ये यशस्वी उद्योजक होण्याची क्षमता असते त्याच्या मनात नैराश्य येऊन आपण एका यशस्वी उद्योजकाला मुकतो असे मत व्यक्त केले.पुढील सहा महिन्यांत अमेरिकेत मराठी उद्योजकांसाठी स्टार्टअप महाराष्ट्र यात्रेचे आयोजन करण्याचे नियोजन असून ह्यात महाराष्ट्रातून होतकरू तरुणांची निवड केली जाईल. तसेच जळगाव मधील स्टार्टअप क्षेत्रात कार्य करू इच्छिणार्यांना मार्गदर्शनासह फंडींगदेखीक उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
अध्यक्षीय भाषणात आमदार भोळे ह्यांनी जळगाव शहरात प्रथमच झालेल्या ह्या कार्यक्रमामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे स्टार्टअप व डिजिटल इंडिया चे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.
तांत्रिक सत्रामध्ये ओंकार दाभाडकर ह्यांनी स्टार्टअप ची पूर्वतयारी नेमकी कशाप्रकारे करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. कुणाल गडहिरे ह्यांनी बिझनेस आयडियाला प्रत्यक्ष स्टार्टअप म्हणून कसे सुरू करायचे तर मनीष पांडे ह्यांनी कस्टमर मिळवण्यापासून स्टार्टअप स्केलेबल कसे करायचे ह्याबद्दल मार्गदर्शन केले.उपस्थित्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. सूत्रसंचालन युवराज परदेशी तर आभार प्रदर्शन मनीष पात्रीकर ह्यांनी केले.