-२ वर्षांच्या अथक प्रयत्नांना लाभले पहिले यश
- पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने दाखविली सकारात्मकता; १५ जुलैनंतर सर्व्हे

जळगाव, ३० मे
भुसावळ तालुक्यासाठी विविध सोयीसुविधांच्या अनुषंगाने डीपीआर (डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट) आणि आरडीपी (रिव्हाईज डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करण्यासाठी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने सकारात्मकता दर्शविल्याने गेल्या दोन वर्षांपासून तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या सुरु असलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गुरुवारी ३१ मे रोजी आ.संजय सावकारे यांनी पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचे संचालक डॉ. आहुजा यांची पुन्हा भेट घेतली असता या भेटीत त्यांनी भुसावळ तालुक्यासाठी डीपीआर बनविण्यासाठी सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती आ.संजय सावकारे यांनी ‘तरुण भारत’ला दिली.
भुसावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) आणि रिव्हाईज डेव्हलपमेंट प्लॅन (आरडीपी) पुण्याच्या शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करून पूर्ण करून घेण्याबाबत आ. सावकारे यांनी महाविद्यालयाच्या संचालकांना पत्र दिले होते. त्यासाठी फेब्रुवारी २०१६ पासून आ. सावकारे पाठपुरावा करीत होते. याबाबत भुसावळ नगरपालिकेने तसा ठरावही मंजूर करून घेतला आहे. तालुक्यातील वरणगाव नगरपालिकाही अशाच प्रकारचा ठराव लवकरच करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.उर्वरित गावे संबंधित कागदपत्रांची पूर्तता करतील असे आश्वासनही त्यांनी दिले.
तालुक्याचा सर्वांगिण विकास होण्यासाठी आ.संजय सावकारे प्रारंभापासूनच प्रयत्नशील आहे. भविष्याचा विचार करुन आगामी काळात भुसावळ शहर जिल्हा होण्याकडे वाटचाल करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर आताची ‘अ’नगरपालिका भविष्यात महानगरपालिका होणार आहे. त्याकरिता शहरासह तालुक्याचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरु आहे. त्या माध्यमातून दूरदृष्टीकोन ठेवून पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे गेल्या दोन वर्षांपासून शहरासह तालुक्याचा डीपीआर आणि आरडीपी तयार करण्यासाठी सतत पाठपुरावा सुरु होता. अखेर गुरुवारी, ३१ मे रोजी स्वत: आ.सावकारे यांनी अभियांत्रिकीच्या संचालकांशी याबाबत चर्चा करुन पत्र दिले. यानंतर संचालकांनीसुद्धा भुसावळ तालुक्याचा डीपीआर बनवून देण्यासाठी सकारात्मकता दर्शवून येत्या १५ जुलैनंतर शहरासह तालुक्याचा सर्व्हे करण्यासाठी ‘अभियांत्रिकी’ची टीम येणार असल्याची माहिती आ.संजय सावकारे यांना संचालकांनी दिली.
काय असणार ‘डीपीआर’मध्ये
शहरात कॉंक्रिटीकरण रस्ते, भूमिगत गटारी, केबल भूमिगत, कचरा संकलन, रेन वॉटर हॉर्वेस्टींग, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस यांच्या जागांबाबत नकाशे तयार करणे- जेणेकरुन भविष्यात अडचण निर्माण होवू नये. प्रभागनिहाय विकासात्मक योजना तयार करणे, तापी नदीकाठाचा उद्यानासह आधुनिक पद्धतीने विकास करणे, तालुक्याच्या ग्रामीण भागांच्या गावांना जोडणारे रस्ते, लहान-लहान भूखंडांची तपासणी, सहकाराच्या माध्यमातून शेतीला पूरक सर्व योजना अशा परिपूर्ण बाबींचा ग्रामीण भागांच्या नागरिकांसाठी या डीपीआरमध्ये समावेश असेल.
शहरासह तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार
गेल्या दोन वर्षांपासून मी पुण्याच्या अभियांत्रिकीच्या संचालक मंडळाशी डीपीआरसाठी पाठपुरावा करीत होते. आज (३१) रोजी पुन्हा भेट घेवून पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालकांनी सकारात्मकता दर्शविली. येत्या १५ जुलैनंतर शहराचा सर्व्हेकरुन नंतर ग्रामीण भागांचा सर्व्हे महाविद्यालयीन विद्यार्थी करणार आहे. डीपीआरनंतर निधी मंजूर करुन शहरासह तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.
-संजय सावकारे, आमदार, भुसावळ