देणे देवदुतांचे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018   
Total Views |

 
 
सर्व सोपस्कार पार पाडले आणि मी त्या रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच मला हव्या असलेल्या रुग्णाच्या कक्षात गेलो. अठरा वर्षांची एक तरुण मुलगी रुग्णशय्येवर बसली होती. सोबत तिची आईदेखील होती. मी येणार असल्याची पूर्वकल्पना असल्याने या दोघींनीही हसून माझे स्वागत केले. त्यांच्या या हसण्याने वातावरणात थोडा मोकळेपणा आला. ’आता परिस्थिती पुष्कळच सावरली आहे, काळजीचे कारण नाही, आपले स्वागत आहे’ अशी या दोघींनी न बोललेली वाक्येदेखील मला त्यांच्या हसण्यामधून सहज ऐकता आली. स्वाभाविकच प्रथम या मुलीच्या तब्येतीची मी चौकशी केली. सर्व काही समाधानकारक असल्याची खात्री करुन मी मुख्य विषयाला हात घातला. विषय अगदी साधा होता. मला या मुलीची आणि तिच्या आईची छोटी मुलाखत घ्यायची होती. महिनाभरापूर्वी या मुलीला डेंग्यूची लागण झाली होती आणि हसती-खेळती असलेली या आई-बाबांची ही एकुलती एक मुलगी एकाएकी एकदम अशक्त झाली. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. रक्तातील ’प्लेटलेट्स’ झपाट्याने कमी होत होत्या. त्यामुळे रक्तदान केलेल्या रक्तातून नंतर वेगळ्या केलेल्या प्लेटलेट्स (random donor platelets – RDP) देऊन इथे भागणार नव्हते तर एकाच प्लेटलेट दात्याकडुन घेतल्या जाणाऱ्या प्लेटलेट्सच्या बॅग्जची (single donor platelets – SDP) इथे आवश्यकता होती. एस.डी.पी. हा रक्तघटक दिल्यानंतर तुलनेने खूपच लवकर शरीरातील प्लेटलेट्सची मात्रा वाढते आणि पुढील धोका टळतो. या मुलीला अशा सहा एस.डी.पी. जनकल्याण रक्तपेढीतून दिल्या गेल्या होत्या. परिणामी ती आता डेंग्यूच्या काळछायेतून बाहेर आली होती.

हे साल होते २०१४. पुण्यात डेंग्युने घातलेल्या थैमानामुळे हे वर्ष गाजले होते. या एकाच वर्षात – किंबहुना – जुलै ते ऑक्टोबर या चारच महिन्यांत जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून एस.डी.पी. हा रक्तघटक विक्रमी संख्येने वितरित झाला होता. अर्थात इतके मोठे काम रक्तपेढी करु शकली, यात सिंहाचा वाटा होता तो रक्तपेढीत येऊन सातत्याने प्लेटलेट दान करणाऱ्या दात्यांचा.

रक्तदानापेक्षा प्लेटलेट दान थोडेसे वेगळे आहे. रक्तदात्यापेक्षा प्लेटलेटदाता हा थोड्या अधिक तयारीचा लागतो. प्लेट्लेट्दानाच्या या प्रक्रियेसाठी साधारणत: एक ते दीड तास लागतो. त्यामुळे स्वाभाविकच शरीरात प्लेटलेट्सची मात्रा ही समाधानकारक असावी लागते आणि ती या प्रक्रियेच्या आधीच पडताळुन पाहिली जाते. शिवाय हा रक्तदाता शारीरिक व मानसिक दृष्ट्याही जरा अधिक तयारीचा लागतो. अशा विशेष गुणवत्तेच्या दात्यांची एक चांगला संच तयार करण्याचे काम रक्तपेढीच्या माध्यमातून प्राधान्याने केले गेले व ज्या प्लेटलेट्स रुग्णांना मिळण्यासाठी ’प्लेटलेटदाते’ शोधण्यात रुग्णांच्या नातलगांचा अमूल्य वेळ जात होता, तो वेळ रक्तपेढीच्या या कामामुळे अगदी शून्यावर आला. त्यामुळे ज्या ज्या रुग्णांना एस.डी.पी. या रक्तघटकाची गरज भासेल त्यांना हा रक्तघटक रक्तपेढीमध्ये कुठल्याही वेळी सहज उपलब्ध होईल अशी रचना लावली गेली. त्यानुसार या प्लेटलेटदात्यांचे वेळापत्रक ठरवले गेले आणि ते आजही अव्याहतपणे चालु आहे. रक्तपेढीचेही काही कर्मचारी या संचात आहेत.

वर उल्लेख केलेल्या २०१४ या वर्षांत एस.डी.पी. वितरणाचा उच्चांक रक्तपेढीने गाठला. त्यामुळे कितीतरी रुग्णांना पुनर्जीवन मिळाले. वेळ-काळ न पहाता रक्तपेढीत येऊन स्वत:ला माहितही नसलेल्या रुग्णासाठी निरपेक्ष वृत्तीने प्लेटलेटदान करुन जाणारे आमचे प्लेटलेटदाते हेच या रुग्णांचे खरे जीवनदाते आहेत याची आम्हाला अर्थातच कायम जाणिव होती. म्हणूनच त्या वर्षी डिसेंबर महिन्यात ’प्लेटलेटदात्यांचे स्नेहमिलन’ हा विशेष कार्यक्रम आम्ही आयोजित केला. हा कार्यक्रम ठरवत असताना ज्या रुग्णांना हा रक्तघटक वेळेत मिळु शकल्यामुळे जीवनदान मिळाले आहे, त्या रुग्णांचे मनोगत प्रत्यक्षपणे या प्लेटलेटदात्यांना कळावे, अशी कल्पना पुढे आली. याच कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यातील काहींना भेटुन व्हिडियो क्लिपिंग्जव्दारे त्यांच्या मुलाखती घेऊन त्या एकत्रितपणे या स्नेहमिलनात दाखविल्या जाव्यात असे ठरले. या उद्देश्याने काही रुग्णालयांना भेटी दिल्या गेल्या आणि रुग्णांच्या काही क्लिपिंग्जही तयार करण्यात आल्या.

सुरुवातीला उल्लेख केलेली भेटही यासाठीच घेतली गेलेली होती. या भेटीत या मुलीने व तिच्या आईने जे मनोगत व्यक्त केले ते अगदी हृदयाच्या तळापासून आले होते. ’या प्लेटलेटदात्यांसाठी आपण काहीतरी बोला’ अशी विनंती केल्यानंतर त्या मुलीच्या आई म्हणाल्या, ’खरंच सांगते, खूप मोलाची कामगिरी केली आहे या प्लेटलेटदात्यांनी. यांचे ऋण व्यक्त करायलाही माझ्याकडे शब्द नाहीत, मग हे ऋण फ़ेडण्याचा तर प्रश्नच नाही. हातातून जात असलेली माझी मुलगी या अज्ञात देवदुतांनी काळाच्या हातून अक्षरश: खेचून आणली आहे. खरंच माझ्याकडे शब्द नाहीत.’ हे त्यांचे मनोगत स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात मोठ्या पडद्यावर सर्व प्लेटलेटदात्यांनी ऐकले आणि ते सर्वच जण भारावुन गेले. हा एक अनोखा संवाद होता. रक्तदान करताना ते कोणासाठी केलं जात आहे, ते कळण्याचा एरवी काही प्रश्न नसतो. पण इथे – या कार्यक्रमासाठी का होईना – रक्तघटकांमुळे जीवनदान मिळालेल्या रुग्णांच्या भावना प्रत्यक्ष प्लेटलेटदात्यांपर्यंत पोहोचत होत्या. केलेल्या अमूल्य दानाचं वर्तुळ आपोआप पूर्ण होत होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक रुग्णांना प्रत्यक्ष भेटुन त्यांच्या भावना समजून घेता आल्या. प्रत्येकाच्या मनात रक्तदात्यांबद्दल असलेल्या कृतज्ञतेचे विलोभनीय दर्शन या रुग्णांना भेटल्यामुळे आम्हाला घडले.

प्लेटलेटदात्यांच्या मनातील शुद्ध भाव तर आम्ही रोजच अनुभवत होतो. मला आठवते, एकदा एका महत्वाच्या शस्त्रक्रियेसाठी एस.डी.पी. हाच रक्तघटक रात्रीतून मुंबईला पाठवायचा होता. ही मागणीच मुळी रक्तपेढीत आली ती रात्री दहा वाजता, आणि दुर्दैवाने काही वेळ आधीच रक्तपेढीत असलेली शेवटची एस.डी.पी. वितरित झालेली होती. पण या वेळी उपस्थित असणाऱ्या तांत्रिक पर्यवेक्षकाने धीर सोडला नाही. त्वरित जनसंपर्क अधिकारी राजेश तोळबंदे यांना संपर्क झाला. काही हक्काच्या प्लेटलेटदात्यांना रात्रीत फ़ोन गेले. त्यातील एक बहाद्दर रात्री साडेअकरा वाजता रक्तपेढीत आला. स्वत: राजेशही यावेळी उपस्थित राहिले. प्लेटलेटदानाची प्रक्रिया व्यवस्थित पार पडली आणि एका कुरियर कर्मचाऱ्याकरवी हा रक्तघटक पहाटे मुंबईला पोहोचलादेखील. प्लेटलेटदाते हे असे आहेत. प्रत्येक जीवनदानाची अशी स्वतंत्र कहाणी आहे आणि या कहाणीचे हे खरे नायक मात्र तशा अर्थाने पडद्याआडच राहुन शांतपणे आपले कर्तव्य बजावीत आहेत.

जुन्या परीकथांतून दु:खी-पीडितांना त्यांच्याही नकळत मदत करुन जाणाऱ्या आणि त्यांचे आयुष्य सावरणाऱ्या देवदूतांचा नेहमी उल्लेख येतो. आपण केलेल्या कामाबद्दल कुठलाही गाजावाजा व्हावा अथवा कौतुक व्हावे, सत्कार व्हावेत अशी थोडीदेखील अपेक्षा न ठेवणारे आणि अनेकांची कुटुंबे सावरणारे हे प्लेटलेटदाते आजच्या काळातील असेच देवदूत आहेत आणि त्यांचे देणे गरजुंपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम म्हणून काम करणे आमच्यासाठी गौरवास्पद आहे !

- महेंद्र वाघ
@@AUTHORINFO_V1@@