राज्यसभा आणि लोकसभा उद्यापर्यंत स्थगित
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या सत्र आजपासून सुरुवात झाली असून कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ घातल्यामुळे दोन्हा सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
आज सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील लोकासभेमध्ये उपस्थित होते. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी नीरव मोदी यांनी केलेल्या पीएनबी घोटाळ्या संबंधीच्या प्रश्नांवरून सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हा मुद्दा आता सभागृहात उपस्थित करू नये, असे आवाहन केले. परंतु विरोधकांनी यावर गदारोळ करत सभागृहाच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली. राज्यसभेमध्ये देखील अशाच प्रकारे गदारोळ घालत विरोधकांनी सभागृहाचे कामकाज ठप्प पाडले. त्यामुळे नाईलाजाने दोन्हीही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले.
ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. सत्राच्य्ना सुरुवातीच्या अगोदरच विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला घेऱ्यासाठी रणनीती तयार केली होती. आज सकाळपासूनच विरोधकांनी संसदेबाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली होती. यावर भाजप सरकारने देखील विरोधकांना त्याच भाषेत उत्तर दिले होते. परंतु याचा काहीही फायदा झाला नाही.