मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव:
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ची सहयोगी कंपनी जैन फार्मफ्रेश फुडसच्या मसाले प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवार, ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सकाळी ११.१५ ला होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे अध्यक्षस्थानी राहतील. जैन फुड पार्क येथे हा कार्यक्रम होईल.
सर्वसामान्य नागरिकांना देखील उच्च प्रतिच्या मसाल्याची चव चाखता यावी, या प्रमुख उद्देशाने या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या मसाले प्रक्रिया प्रकल्पाची वार्षिक क्षमता २४ हजार टन इतकी आहे. यामध्ये आलं, लसुण, कांदा, मिरची यांची पेस्ट तयार केली जाईल. त्याप्रमाणे कोरडा मसाला देखील तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी १०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, त्यासाठी लागणारा कच्चा माल जळगाव, धुळे, नंदुरबारसह मध्यप्रदेश व गुजरातला लागून असलेल्या परिसरातील शेतकर्यांकडून घेतला जाणार आहे. प्रकल्पातून तयार होणारा माल सुरुवातीच्या काळात निर्यात केला जाणार आहे. आगामी काळात भारतात उपलब्ध होणार आहे. मसाले प्रक्रिया प्रकल्प उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जैन इरिगेशचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केले आहे. या उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.