माजी कुलगुरु प्रा.माळी यांचे प्रतिपादन
जळगाव :
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यात शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यामुळे विद्यार्थी वर्गात टिकेल यासाठी उत्तम शिकविण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केल्यास विद्यार्थी आणि समाज त्यांना आदर्श म्हणेल, असे प्रतिपादन माजी कुलगुरु प्रा.आर.एस.माळी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित विभागातर्फे आयोजित उजळणी वर्गाचे उद्घाटन करताना प्रा.माळी बोलत होते. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, उजळणी वर्गाचे समन्वयक तथा विभागप्रमुख प्रा.एस.आर.चौधरी, उपसमन्वयक प्रा.के.एफ.पवार उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने 30 डिसेंबरपर्यंत या आंतरविद्याशाखीय उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनपर भाषणात प्रा.माळी म्हणाले की, उत्तम शिक्षक होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा.
विषय शिकविण्याची हातोटी आणि कौशल्य यासोबतच नावीन्यपूर्ण कल्पना शिक्षकाकडे असणे आवश्यक आहे. विद्यार्थी वर्गात बसत नसतील तर ती बोच शिक्षकांमध्ये असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना खूश करण्यावर शिक्षकांचा भर नको, असे सांगताना मूल्यमापन तावून-सुलाखून केले जावे. पेपर सेटिंग करताना गांभीर्याने विचार करा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा.पी.पी.पाटील यांनी अध्ययन आणि अध्यापनात शिक्षकांनी नवे बदल लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. नवे बदल स्वीकारण्यासाठी प्राध्यापक लवकर तयार होत नाहीत याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
प्रारंभी प्रा.के.एफ.पवार यांनी प्रास्ताविक केले. उजळणी वर्गाविषयीची सविस्तर माहिती प्रा. एस. आर.चौधरी यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा उंटवाल या विद्यार्थिनीने केले तर स्वप्निल वाणी यांनी आभार मानले.