मुंबई : रविवारी मशिद स्थानकातील जुना पादचारी पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ६ तासांच्या कालावधीत मशिद आणि सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही. तसेच हार्बरवरही सीएसएमटी ते वडाळा स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही. भायखळा आणि सीएसएमटीपर्यंत सर्व अप आणि डाऊन लोकल जलद मार्गावर चालतील. हा मेगाब्लॉक एकूण चार मार्गिकांवर चालेल. त्यात दोन हार्बर मार्गांचा समावेश असून, मध्य रेल्वेवरील दोन धीम्या मार्गांचा समावेश आहे.
मशीद स्थानकाजवळ सीएसएमटीच्या दिशेने असलेल्या ३० वर्षांहून अधिक जुन्या पादचारी पुलाला पडणार आहेत. त्या जागी नवीन पूल उभारणार असल्याने पाच-सहा तासांचे दोन ब्लॉक घेतले जाणार आहेत. नवीन पुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामासाठी सीएसएमटी ते भायखळापर्यंत अप आणि डाऊन अशा दोन्ही धीम्या लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पूल पाडण्यासाठी आणि नवीन पूल बांधण्यासाठी एकूण ४५ दिवसांचा कालावधी ठरवण्यात आला आहे. या कालावधीत पादचारी पुलावरील तिकीट आरक्षण केंद्रही बंद ठेवले जाईल.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी घेतला जाईल मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर रविवार मेगाब्लॉक घेतला जाणार नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. त्याऐवजी शनिवारी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० पर्यंत वसई ते विरार स्थानकांदरम्यान धीम्या गतीच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत काही लोकल वसई ते विरारदरम्यान जलद मार्गांवर चालतील. त्यामुळे लोकल सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/