मुंबई : प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी अग्रेसर असणारी मध्य रेल्वे मस्जिद येथील मुंबई दिशेकडील पादचारी पूल पाडून नव्याने बांधणार आहे. पादचारी पूलावरील वाढती पादचा-यांची संख्या लक्षात घेऊन हा नविन पादचारी पूल बांधण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. २६ नोव्हेंबरपासून या पुलाच्या नूतनीकरांचे काम सुरु होणार आहे.
पादचारी पुलाची लँडिंग २.४४ मीटरवरुन ४.८८ मीटरपर्यंत वाढविली जाईल. २.४४ मीटरच्या जिन्यांची रुंदी ३.६६ मीटरपर्यंत वाढविली जाईल. तर १.८० मीटरच्या पायऱ्यांची रुंदी २.३० मीटरपर्यंत वाढविली जाणार आहे. दरम्यान, हे काम रेकॉर्ड वेळेत पूर्ण करण्यात येण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
नूतनीकरण्याच्या कामामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रात्रंदिवस काम चालू राहणार आहे. या काळात दि. २ डिसेंबर आणि दि. १६ डिसेंबर रोजी प्रत्येकी ५ तासांचे दोन मेगाब्लॉक ४ मार्गांवर घेण्यात येणार आहेत. यामध्ये २ मेगाब्लॉक हार्बरमार्गावर आणि २ धीम्यामार्गावर घेण्यात येणार आहेत. तसेच या काळात पादचारी पूलावरील बुकिंग ऑफिस देखील बंद राहणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/