आता सीबीआयमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, त्याला कॉंग्रेसकडून राजकीय स्वरूप देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. सीबीआयमध्ये जे काही घडते आहे, ते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले असून, या प्रकरणात कायदा आपल्या शैलीने काम करीत आहे. त्यामुळे कॉंग्रेसने यात आपली ऊर्जा खर्च करण्यापेक्षा जनतेपुढे काही ठोस कार्यक्रम ठेवला, तर कदाचित कॉंग्रेसला थोडाफार फायदा होऊ शकेल. पण, कॉंग्रेस नुसती टीका करण्यातच धन्यता मानत आहे आणि मोदी देशाला पदोपदी प्रगतिपथावर नेण्यात यशस्वी ठरत आहेत. आपल्या देशातील जनतेची सर्वांगीण प्रगती कशी साधता येईल, याचाच सातत्याने विचार करणारे मोदी श्रेष्ठ, की मोदींवर कपोलकल्पित आरोप करणारे राहुल गांधी चांगले, याचा फैसला जनतेकडून केला जाईलच. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जनकल्याणाच्या ज्या योजना राबविल्यात, त्या लक्षात घेत सेऊल पीस फाऊंडेशनने मोदींची शांती पुरस्कारासाठी निवड केली, ही बाब लक्षात घेतली, तर मोदींची गाडी योग्य दिशेने प्रवास करते आहे, हे स्पष्ट होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल आणि आणि त्यांचा कॉंग्रेस पक्ष जातीयवादाचा आरोप करीत असला, तरी सेऊल पीस फाऊंडेशनला ही बाब अजीबात मान्य नाही. मोदींनी भारतातील जनतेमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केलेत, जाती-जातीत बंधूभाव कसा वाढीस लागेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत, याची दखल सेऊल पीस फाऊंडेशनसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली, यातच सगळे आले. संपूर्ण जगाच्या आर्थिक प्रगतीची कामना, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारतीय जनतेच्या मानवीय विकासाला गती देण्यासाठी केलेले प्रयत्न, या बाबी प्रामुख्याने लक्षात घेत संस्थेने मोदींची पुरस्कारासाठी निवड केली आहे, याकडे भारतातील विरोधी पक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. सामाजिक ऐक्य घडवून आणत भारतातील लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मोदींनी केलेल्या कामाची दखल कॉंग्रेस पक्ष कधीच घेणार नाही. तशी अपेक्षा करणेही चूकच. पण, आंतरराष्ट्रीय पातळीवर ती दखल घेतली गेली आहे.
भारतातील सामाजिक विषमता कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जे प्रयत्न केलेत, त्यात ते बर्यापैकी यशस्वी ठरलेत, असे अधिकृत निवेदनच सेऊल पीस फाऊंडेशनने केले असल्याने कॉंग्रेसने कितीही टीका केली, तरी त्याला काही महत्त्व उरलेले नाही. जनकल्याणाच्या जेवढ्या योजना मादींनी पंतप्रधान झाल्यानंतर सुरू केल्यात, त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसायला लागले आहेत. जगातल्या अनेक देशांनी ही बाब मान्य केली आहे. सेऊल पीस फाऊंडेशननेही ही बाब मान्य केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसने ही बाब मान्य नाही केली तरी फार फरक पडण्याचे कारण नाही. कॉंग्रेसला मोदींचे कोणतेच चांगले काम दिसत नाही. सत्तेत येण्याची घाई झालेली कॉंग्रेस, देशाच्या पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करते आहे, ही बाब लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच सर्वप्रथम जनधन योजना राबविली. ज्या लोकांनी कधी बँक पाहिलीच नव्हती, अशा लोकांची खाती बँकेत उघडली गेल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचा अनुकूल परिणाम झाला आहे. सरकारी योजनांचा लाभ आता थेट जनतेला मिळायला लागलेला आहे. योजनांममधला पैसा गरिबांपर्यंत न पोहोचण्याचे कारण म्हणजे भ्रष्टाचार. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनधन योजना प्रभावी सिद्ध ठरली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन पंतप्रधानांनी गरिबांच्या झोपडीतील धूर आणि काळोख दूर केला आहे. स्वच्छ भारत अभियान राबवून मोदींनी फार मोठे काम केले आहे. अस्वच्छतेमुळे आजार, रोगराई पसरायची आणि सार्वजनिक जीवनही त्यामुळे गढूळ व्हायचे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगत त्यांच्याच माध्यमातून स्वच्छता घडवून आणण्याची दमदार कामगिरी मोदींनी केली आहे. नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. ते जगात जिथे जिथे गेलेत, तिथे तिथे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली आहे. सदैव सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करताना त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे केंद्रित केले. त्यामुळेच भारतात काय सुरू आहे, याची माहिती जागतिक समुदायाला झाली...