वरणगाव २१ ऑक्टोबर
येथील नगरपरिषदेच्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने अखेर ऐन दिवाळी सणामध्ये भारतीय मजदूर संघप्रणीत नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिल्याने शहरातील नागरिकांची कामे या आंदोलनामुळे खोळंबणार आहे.
नगरपरिषदेच्या स्थापनेपासूनच दीर्घकाळ दुर्लक्षित व प्रलंबित मागण्यांसाठी मजदूर संघाने दिवाळीच्या मुहूर्तावर काम बंद आंदोलनाचा इशार्यातून ‘आता नाही, तर कधीच नाही’ या भावनेने रणशिंग फुंकले आहे. गेल्या चार वर्षांपासून संघटना कर्मचार्यांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत प्रत्येक पातळीवर पत्रव्यवहार, समक्ष भेटी, आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत होती. परंतु गेंड्याच्या कातडीचे प्रशासन भेदभावपूर्ण वागणुकीने नगरपरिषदेच्या कर्मचार्यांच्या मूलभूत हक्कांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. म्हणूनच नाईलाजाने स्थगित आंदोलन पुन्हा करण्याचा निर्णय भारतीय मजदूर संघाने घेतला आहे. या निर्णयापूर्वी जलसंपदामंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, नगराध्यक्ष सुनील काळे यांना अनेकवेळा भेटून, निवेदन देऊनही फक्त आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नसल्याचेही मजदूर संघाने दिलेल्या निवेदनात नमूद केले
आहे.
असे असणार आंदोलन
येत्या २९ ऑक्टोबर, सोमवार रोजी दुपारी जेवणाच्या सुटीत प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र निदर्शने तसेच दुपारी ४.३० वाजता भव्य द्वारसभा घेण्यात येणार आहे. ३० ऑक्टोबर मंगळवार रोजी बेमुदत काम बंद आंदोलन संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत. आंदोलनाची सुुरुवात रात्री १२ पासून करण्यात येणार आहे. यावेळी अनेक कर्मचारी सोबत राहणार आहेत.
आंदोलनावर ठाम
येथील नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी कायम येत नाही त्यामुळे बाकीच्या कर्मचार्यांचा प्रस्ताव पाठविण्यामध्ये अडचणी येत आहेत. फक्त १४ कर्मचार्यांना आकृतिबंधात बसविले. बाकीच्या कर्मचार्यांना का बसविले नाही? वारंवार निवेदन देऊनही उपयोग होत नसल्याने आम्ही येत्या २९ तारखेपासून आंदोलन करणार आहोत. याआधी आम्ही आंदोलने स्थगित केलेली आहे.
- अनंत गडे, अध्यक्ष नगरपरिषद मजदूर संघ युनिट, वरणगाव
कर्मचार्यांनी आंदोलन करू नये
नगरपरिषदेच्या कर्मचार्यांचा प्रलंबित मागण्यांचा विषय हा राज्यस्तरावरचा आहे. कर्मचार्यांना मी स्वत: वेळोवेळी मदत करत आलो आहे. ना.गिरीश महाजन यांच्याशी भेटून कर्मचार्यांचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचेही आश्वासन ना.महाजन यांनी दिलेले आहे. परंतु कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलन करत असतील आणि शहरातील नागरिकांना त्रास होणार असेल, तर त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी हे आंदोलन करू नये. फक्त वरणगाव नगरपरिषदेच्या कर्मचार्यांचा विषय नसून संपूर्ण महाराष्ट्रातील न.पा.कर्मचार्यांचा हा विषय आहे. त्यामुळे राज्यस्तरावरूनच हा निर्णय घेतला जाणार आहे.
- सुनील काळे, नगराध्यक्ष, वरणगाव
अशा आहेत प्रमुख मागण्या
नगरपरिषदेतील फक्त १४ कर्मचार्यांना आकृतिबंधात समाविष्ट करण्यात आले आहे, सर्व कर्मचार्यांचा आकृतिबंधात समावेश झाला पाहिजे. सर्व कर्मचार्यांच्या पी.एफ.खात्यातील त्रुटी दूर करून सर्व पी.एफ.खाती सन २०१४ पासून अद्ययावत करण्यात यावी. दिवाळी २०१८ साठी सर्व कर्मचार्यांना प्रत्येकी १० हजार सानुग्रह अनुदान देण्यात यावे. लाड कमिटीच्या शिफारशीनुसार निवृत्त सफाई कार्मचार्यांच्या वारसास तसेच मृत कर्मचारी यांच्या वारसास न.प.सेवेत विनाविलंब सामावून घेण्यात यावे. पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्यांना सप्टेंबर २०१४ पासून एकही साप्ताहिक सुटी न दिल्याने आजपावेतो सर्व साप्ताहिक सुटी देण्यात यावी, अशा मागण्या नगरपरिषदेच्या कर्मचार्यांच्या आहेत. या सर्व मागण्या येत्या २६ ऑक्टोबरपर्यंत मंजूर नाही झाल्या, तर २९ पासून आंदोलनावर ठाम असल्याचेही म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. गिरीश महाजन, खा. रक्षा खडसे, आ. एकनाथराव खडसे, आ.संजय सावकारे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वरणगाव पोलीस स्टेशन यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर नगरपरिषदेतील ४३ कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.