कर्णधार विराट कोहलीचे सहावे द्वीशतक

नवी दिल्ली : भारत व श्रीलंका यांच्यात दिल्लीतील फिरोझशहा कोटला स्टेडियम येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील आजच्या दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या ३ गडी बाद १३१ धावा झाल्या. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक नाबाद ५७ धावा केल्या तर दिलरुवान परेराने ४२ धावा केल्या. सद्या अजेलो मॅथ्यूज व कर्णधार दिनेश चंडिमल खेळत आहेत.
आज सकाळी खेळ सुरु झाला तेव्हा भारताने कालच्या आपल्या ४ बाद ३७१ धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या कालच्या १५६ धावसंख्येवरून पुन्हा एकदा दमदार फलंदाजीस सुरुवात केली व कारकिर्दीतील आपले ६वे द्वीशतक झळकवत तब्बल २४३ धावा केल्या. तर रोहित शर्मानेही त्याला योग्य साथ देत ६५ धावा केल्या. मात्र त्यानंतर कोणीही फलंदाज फार धावा न करू शकल्याने भारतीय संघाने आपला डाव घोषित केला. भारताने १२७ षटके व ५ चेंडूंत ७ बाद ५३६ धावा केल्या. श्रीलंकेच्या लक्षण संदकन याने सर्वाधिक ४ बळी घेतले तर लाहिरू गमगे याने २ बळी घेतले.
त्यानंतर श्रीलंकेच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली ती दिमुथ करुणारत्ने व दिलरुवान परेरा या सलामीवीर जोडीने. मात्र दिमुथ डावाच्या पहिल्याच चेंडूला बाद झाल्याने भोपळा न फोडताच तंबूत परतला. दिलरुवानने त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजच्या सहाय्याने भागीदारी उभी करत ४२ धावा केल्या. दिमुथ नंतर खेळायला आलेल्या धनंजया डि सिल्वालाही केवळ एकच धाव करता आली. सध्या अँजेलो मॅध्यूज ५७ धावांवर तर दिनेश चंडिमल २५ धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवसअखेर श्रीलंकेच्या ४४ षटके व ३ चेंडूंत ३ गडी बाद १३१ धावा झाल्या होत्या.