महाराष्ट्रातल्या एका ग्रामीण आदिवासी बहुल क्षेत्रातील निमशहरी भागात प्रवास करण्याचा योग नुकताच आला. नंदुरबार हा उत्तर महाराष्ट्रातील एक आदिवासी बहुल वस्ती असलेला जिल्हा. या नंदुरबार शहरात फिरताना एका चौकात अत्यंत सुंदर प्रतिमा उभारलेली पाहायला मिळाली. आर. के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ची आठवण व्हावी अशा बिनचेहर्याच्या व्यक्तींनी आपले दोन्ही बाहू उभारुन उचलून धरलेले अशोक चक्र असे त्या प्रतिमेचे स्वरुप आहे. आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी एकात्मतेच्या ज्या उदात्त तत्वावर संपूर्ण घटना साकारली आहे, नेमकी तीच भावना देशातला सर्वसामान्य नागरिक त्याच्या अंतरंगात बाळगतो असे या प्रतिकात्मक प्रतिमेतून व्यक्त करण्यात आले आहे असे प्रकर्षाने वाटून गेले म्हणूनच या अंकाच्या मुखपृष्ठावरही त्याच प्रकारची प्रतिमा चितारण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यघटनेविषयी समजूत, जाणीव आणि निष्ठा अधिकाधिक परिपुष्ट करीत जाण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याच्या भूमिकेतूनच ‘विमर्श’ तर्फे राज्यघटना विशेषांकाची ही मालिका प्रसिद्ध करण्यात येत आहे.
अलीकडच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आरक्षण, समान नागरी कायदा यासारख्या घटनेशी संबंधित बाबींवर निर्माण झालेली चर्चा, आंदोलने, समस्या आदींची पार्श्वभूमी या अंकांना निश्चितच आहे. मात्र त्या निमित्ताने राज्यघटनेच्या संबंधात मूलभूत आणि सखोल चर्चा घडून यावी या व्यापक उद्देशाने अंकाची रचना करण्यात येत आहे. त्यामुळेच एकाच अंकावर समाधान न मानता दोन किंवा तीन अंकांची मालिकाच प्रसिद्ध करावी अशी तयारी सुरु केली. पहिला अंक नुकताच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आला. ज्येष्ठ घटनातज्ञ आणि लोकसभेचे सचिव या नात्याने काही काळ काम केलेले डॉ. सुभाष कश्यप, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि विधी आयोगाचे माजी उपाध्यक्ष ना. मा. घटाटे यांच्यासारख्या नामवंतांनी या अंकात आपले मोलाचे योगदान दिले आहे. प्रदीप जोशी, मोहन पुराणिक या निवृत्त न्यायाधीशांनी तसेच राज्य घटनेचे प्राध्यापक प्रा. उल्हास बापट इ. अभ्यासकांनी लिहिलेले लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. प्राचार्य श्याम अत्रे यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचा सम्यक आढावा त्यांच्या लेखातून घेतला आहे तर डॉ. मंगला मिरासदार यांनी प्राचीन भारतातील संविधान परंपरेचा माहितीपूर्ण आढावा घेतला आहे. या अंकाचे संबंधित वर्तुळात चांगले स्वागत झाले.
आता हा दुसरा अंक आपल्या हाती देत आहोत. भारतीय राज्यघटना निर्मितीची पार्श्वभूमी, प्रक्रिया आणि औचित्य याविषयी चे लेख पहिल्या अंकात समाविष्ट करण्यात आले होते. त्याच बरोबर घटनेच्या काही (संघराज्य संबंध, घटनेची उद्देशिका, लोकशाहीचे स्वरुप इ.) महत्त्वाच्या पैलूंचे विवेचन करणार्या लेखांचाही समावेश करण्यात आला आहे. आता या दुसर्या अंकात त्यापुढील काही महत्त्वाच्या विषयांचा उहापोह करीत आहोत. कायदे रचना, व्यक्तिस्वातंत्र्य, सत्तायंत्रणेच्या मर्यादा, प्रशासन इत्यादींबाबतची परिभाषा करणारा ‘मॅग्ना चार्टा’ हा बहुसंख्य पाश्चात्य राष्ट्रांच्या संवैधानिक चौकटीचा मूलाधार आहे. स्वतंत्र भारताच्या संविधानावरही स्वाभाविकपणे ‘मॅग्ना चार्टा’चा काहीसा प्रभाव आहे. या विषयीचा सविस्तर लेख अॅड. आशिष सोनावणे या तरुण अभ्यासकाने लिहिला आहे. त्या व्यतिरिक्त घटनादत्त मूलभूत अधिकारांची व्याप्ती आणि मर्यादा, निवडणूक सुधारणा, घटना दुरुस्तीची प्रक्रिया, सर्वोच्च न्यायालयाचे संविधानातील तरतूदींबाबतचे काही महत्वपूर्ण निवाडे यासारख्या विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. विद्यमान केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी विमर्श साठी दिलेली मुलाखत या अंकात देत आहोत.
पहिल्या अंकातून घटना निर्मितीच्या प्रारंभिक प्रक्रियेचा परिचय करुन घेतल्यानंतर आता घटनेचा सविस्तर परिचय करुन घेण्याचे पुढचे पाऊल टाकण्याचा प्रयत्न या अंकाव्दारे केला आहे. या प्रयत्नात पदोपदी जाणवत राहिले कि सगळ्या महत्वाच्या पैलूंना स्पर्श करायचा असेल तर आणखी किमान एका तिसर्या अंकाची रचना करावी लागेल. तिसर्या अंकाविषयीचा संकल्प मनात जागवूनच हा दुसरा भाग आपल्या हाती देत आहोत... धन्यवाद !
अरुण करमरकर