प्रातिनिधिक छायाचित्र
परवा ऑफिसचं काम संपवून घरी आलो आणि गाडी पार्किंगमध्ये लावताना एक गोष्ट लक्षात आली की आमच्या पार्किंगच्या तुटलेल्या भिंतीचं काम सुरू झालं होतं. सिमेंट, विटा, वाळू सगळं सामान आणून टाकलं होतं. मला काही कळेचना. आमच्याकडून कोणताच अतिरिक्त मेंटेनन्स घेतला नाही, तशी सूचना नाही नोटीस बोर्डवर मग असं अचानक बिल्डिंगचे चेअरमन उदार कसे झाले तेच लक्षात येईना. बर इतक्यात कोणाकडे लग्न असल्याचंही ऐकिवात नाही. मग अचानक हा 'विकास' कसा सुरू झाला त्याची काही लिंक लागेना. न राहावून मी घरी आल्यावर जेवताना विषय काढला तर कळलं की आजच सकाळी आमच्या वॉर्डाचे नगरसेवक येऊन सोसायटीची 'मीटिंग' घेऊन गेले. आणि मग मला सगळा खुलासा झाला. त्यांचा म्हणे मतदारसंघाचा दौरा सुरू झाला आहे. कोणाच्या काही 'अडचणी' असतील तर सोडवायला आलो आहोत असं त्यांनी सांगितलं. मग आमच्याही चेअरमन साहेबांना लोकांची अडचण लक्षात आली. आणि त्यामुळे मग सहज त्यांनी त्या तुटलेल्या भिंतीकडे पाहिलं आणि नगरसेवक साहेबांना काय समजायचं ते समजलं. साहेब दौरा आटोपून घरी पोहोचायच्या आत आमच्या बिल्डिंगमध्ये काम सुरू झालं होतं.
तशी आमची सोसायटी खूपच सोफिस्टिकेटेड बरं का. कोणीही उमेदवार आला तर आमचे लोक पैसे अजिबात घेत नाहीत. किंबहुना अशा उमेदवाराला दारात सुद्धा उभा करत नाहीत. अहो इतकंच काय साधं पत्रकही लावू देत नाहीत सोसायटीच्या फलकावर. हां अर्थात गेल्या वेळेला आमच्या सोसायटीला रंग दिल्याचं आठवतंय मला. पण ते फक्त सौजन्य म्हणून करून दिलं होतं अशाच कोणा उमेदवारानं. आणि त्याच्या मागच्या वेळी बिल्डरवर दबाव टाकून सोसायटीचं डीड करून घेतलं होतं. मध्ये एकदा फक्त सोसायटीत बरेच ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांची आधार कार्ड काढण्यासाठी विरोधी पक्षातील एका इच्छुक नेत्याचे कार्यकर्ते बोलवले होते. तेवढं सोडलं तर सोसायटी तसं कोणाचंच मिंधेपण घेत नाही.
मागे एकदा आमच्याकडे नवीन आलेला एका वॉचमन त्यांच्या झोपडपट्टीत कसे पैसे वाटून मतदान फिरवलं जातं वगैरे वगैरे सांगत होता. तेव्हा त्याच्याकडे चेअरमन साहेबांनी इतका जळजळीत कटाक्ष टाकला की त्याने पुढचं सांगितलंच नाही. "आमच्या सोसायटीत असली चर्चा सुद्धा कोणी खपवून घेत नाही. शी ... पैसे घेऊन मतदान करायचं म्हणजे काय ? यासाठीच का आपण लोकशाही स्वीकारली ? अशाने भ्रष्टाचार वाढतो ... " असं त्याला सांगितल्यावर तो गप्प बसला होता. त्या रात्री मीटिंगमध्ये आपण कसं विकासाचा विचार करून मतदान केलं पाहिजे वगैरे विषयावर चेअरमन साहेबांचं एक छोटेखानी व्याख्यान झालेलं मला आठवतंय.
प्रातिनिधिक छायाचित्र
आज घरातून निघताना सहज इकडे तिकडे बघत गेलो आणि बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. सभोवताली विकासाची एक सूज आल्यासारखी दिसते आहे सध्या. आत्ता दिवाळीत जशी सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रमांची सूज आली होती अगदी तशीच. इच्छुक उमेदवारांचा लोकसंपर्क वाढला आहे. रोज सकाळी प्रभागातला परिसर स्वच्छ आहे की नाही याकडे नगरसेवक जातीनं लक्ष घालत आहेत. सोसायट्यांच्या मीटिंगा, गणपती मंडळांचे अध्यक्ष, हास्य क्लब, सकाळी फिरायला जाणारे ग्रुप या सगळ्यांमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे. आपण कसे इथलेच आहोत, आपल्याला कशी इथल्या प्रश्नांची जाण आहे, सध्याचे लोक कसे पैसे खातात, आपल्याकडे कसा पैसा नाही पण फक्त लोकहितासाठी आपण हे करतोय वगैरे चर्चा सुरू होतात. काही अडचण असेल तर सांगा आपण करून देऊ असं 'मैत्रीपूर्ण आवाहन'ही केलं जातं.
सर्वच पक्षातले इच्छुक उमेदवार त्याचं काम चांगल्या पद्धतीने जाणतात. प्रश्न आहे तो आपला. आपण तथाकथित सुजाण मतदार आहोत. झोपडपट्टीमधून चालणाऱ्या पैसेवाटपाची आपल्याला चीड येते. पण आपणही नकळतपणे तेच करत आहोत हे मात्र आपण सोयीस्कररित्या विसरतो. सोसायटीचा निर्णय आहे असं म्हणून आपण त्यातून आपलं अंग काढून घेतो. पण नकळतपणे आपणही त्यांचे मिंधे तर होत नाही ना याचा विचार करायला हवा. अन्यथा आत्ताच्या सोसायटीच्या किरकोळ कामांच्या लाचेमुळे पुढची चार वर्ष त्रासाला सामोरं जाण्याची तयारी ठेवायला हवी. महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत ... 'व्हाईट कॉलर' मतदारांनो सावध व्हा !!