खानिवडे : शिरसाड ते वज्रेश्वरी मार्गावरील रस्त्याची अवस्था मागील दोन दिवसांच्या पावसात अधिकच बिकट झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याचा डांबरी स्वरूपाचाच पत्ता लागत नाही. त्यामुळे रोजच वाहतूक मंदावते, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि वाहनचालक व प्रवासी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गाची डागडुजी काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती, मात्र मागील दोन दिवसांच्या पावसात ती अक्षरशः वाहून गेली आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, यावर्षी प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी या रस्त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे.
शिरसाड-वज्रेश्वरी रस्ता हा वसईपूर्व महामार्गापासून निघणारा आणि अनेक गाव, पाडे, वस्त्यांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. या रस्त्याचा उपयोग वसई, विरार आणि मुंबईकडे शिक्षण, नोकरी आणि उपचारासाठी प्रवास करणारे विद्यार्थी, कामगार आणि रुग्ण करतात. तसेच हा शेतीप्रधान भाग असल्याने शेतकऱ्यांना आपला माल बाजारात नेताना देखील हाच रस्ता वापरावा लागतो.
रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे दुचाकीस्वार पडण्याचे प्रकार घडत आहेत, तर चारचाकी वाहने अडकून बसत आहेत. विकास कामाच्या नावाखाली रस्त्याच्या बाजूने करण्यात आलेले खोदकाम पूर्णपणे न भरल्याने साईडने जाणारी वाहनेही रुतत आहेत. परिणामी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि वाहनधारक हैराण झाले आहेत.
स्थानिकांनी लवकरात लवकर या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.