तलासरी : तलासरी तालुक्यात महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना अंतर्गत आठशेहून अधिक बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम दहाणू विधानसभा संयोजक विनोद मेढा यांच्या पुढाकाराने व हस्ते पार पडला.
या उपक्रमात झरी, गिरगाव, घिमणिया, तलासरी, उपलाट, कुर्झे, काजळी, वरवाडा, उधवा आदी गावांतील कामगार लाभार्थी सहभागी झाले होते. लाभार्थ्यांना किचनसाठी आवश्यक भांडी व गृह उपयोगी साहित्य वितरित करण्यात आले.
घरगुती साहित्य मिळाल्याने अनेक लाभार्थ्यांच्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळाल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी तलासरी नगरपंचायतीचे नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य, भाजप पदाधिकारी, आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावोगावी भाजपाच्या जनसंपर्कात वाढ झाली असून, सामाजिक पातळीवर बांधकाम कामगारांचा सन्मान आणि उत्थान साधले गेले.