विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात सध्या ढगाळ हवामान आणि पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भात पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. काही भागांतील शेतकऱ्यांच्या वानांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः अधिक आढळून आला असून, त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी जगदीश दोंदे यांनी काही शेतजमिनींवर पाहणी केली. त्यांनी नमूद केले की, ट्रायसायक्लोझोल (Tricyclazole) आणि हेक्साकॉनझोल (Hexaconazole) ही दोन रोगप्रतिबंधक औषधे योग्य प्रमाणात फवारणी केल्यास करपा रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की त्यांनी तात्काळ या औषधांची फवारणी करून पिकाचे संरक्षण करावे. हवामानामुळे रोगाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो, त्यामुळे विलंब न करता उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.